Sun, Jan 19, 2020 21:18होमपेज › Konkan › रेशन कार्डधारकास देशभरात कुठेही मिळणार धान्य!

रेशन कार्डधारकास देशभरात कुठेही मिळणार धान्य!

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 10:48PMकणकवली : अजित सावंत

केंद्र शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम व सुलभ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेशनकार्डवरील कुटुंब प्रमुख व लाभार्थी आधारशी लिंक करण्यात आले आहेत. तसेच बायोमेट्रिक प्रणालीद्वारे पॉस मशिनवर अंगठा लावून धान्य वाटप करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आता त्यापुढे जाऊन देशभरातील कोणत्याही रेशन कार्डधारकास कोणत्याही राज्यात रेशनवरील धान्य उपलब्ध होणार आहे. त्याला कोणत्याही राज्याची अथवा जिल्ह्याची सीमा आड येणार नाही. विशेषतः कामधंद्यानिमित्त आपला गाव सोडून दुसर्‍या ठिकाणी गेलेल्या कुटुंबांना, कामगारांना त्याचा अधिक लाभ होणार आहे.  

धान्य वितरण व्यवस्थेतील काळ्या बाजाराला चाप बसावा, खर्‍या आणि गरजू लाभार्थींना रेशनवरील धान्यांचा लाभ मिळावा, धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या उद्देशाने सर्व रेशनकार्ड आधारशी लिंक करण्यात आले आहेत. काही ठिकाणी ही प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कुटुंब प्रमुखाबरोबरच लाभार्थ्यांचीही आधारशी लिंक झाली आहे. तसेच पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशिनवर अंगठा लावून धान्य वाटप केले जाते. ज्याची आधारशी लिंक आहे त्या कुटुंबप्रमुख किंवा त्या कुटुंबातील लाभार्थ्यांना हे धान्य दिले जाते. म्हणजेच कुणाच्या रेशनकार्डवरील धान्य कुणीही त्याला फसवून घेऊ शकत नाही. तसेच बोगस रेशनकार्ड करूनही यापूर्वी धान्य उचलणार्‍यांनाही या बायोमेट्रिक प्रणालीमुळे चाप बसला आहे.

 आता केंद्र शासनाने कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणच्या परवानाधारक सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनधान्य दुकानातून रेशनकार्डवर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या वितरण व्यवस्थेवर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभी केली जाणार आहे. त्यामुळे काळ्या बाजारात विक्री होणारे धान्य पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच संबंधित रेशन कार्डधारकाला त्याच्या हक्काचे धान्य घेतल्यानंतर त्याला त्याबाबतचा मेसेजही त्याच्या मोबाईलवर जाणार आहे.  

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एकात्मिक व्यवस्थापन अंतर्गत हा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना जोडले जाणार आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेलेल्या व्यक्‍तींना त्या ठिकाणी रेशनवरील धान्य मिळणार आहे. या निर्णयाचा अधिक फायदा ग्रामीण खेडेगावातून रोजगारासाठी दुसर्‍या ठिकाणी गेलेल्या लोकांना होणार आहे. लवकरच हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.

 पहिल्या टप्प्यात राज्यात कुठेही धान्य उपलब्ध होणार 

याबाबत सिंधुदुर्गच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता या उपक्रमाची सुरूवात प्रथम राज्यातून होणार आहे. राज्यात कुठेही आणि कुठल्याही परवानाधारक रेशनधान्य दुकानांवर रेशनकार्ड धारकाला धान्य उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्गात रेशनकार्ड आधारलिंक करण्याचे काम 82 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 2 लाख 35 हजार रेशनकार्ड धारकांपैकी 1 लाख 60 हजार रेशनकार्ड धारकांना धान्य दिले जाते. जसजशी रेशन कार्ड आधार लिंक करण्याची 100 टक्के प्रक्रिया देशभरात पूर्ण होईल, सर्वंकष माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल त्यावेळी राज्याप्रमाणेच देशभरात कुठेही कुठल्याही रेशनकार्ड धारकाला धान्य उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.