होमपेज › Konkan › ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाचे  होणार ‘आयटीआय’

‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाचे  होणार ‘आयटीआय’

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 10:56PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

राज्यात 1988 मध्ये ‘एमसीव्हीसी’ हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. हा अभ्यासक्रम म्हणजे आयटीआय आणि पॉलिटेक्निक या दोन अभ्यासक्रमांमधील मधला स्तर मानला जातो. मात्र, या कॉलेजांचे ‘आयटीआय’ किंवा ‘व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये (व्हीआयटी) रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. 

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असून अकरावी आणि बारावीसाठी विद्यार्थ्यांना दोन भाषा विषयांसह सहा विषयांची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळत असे. तसेच, शिक्षण पूर्ण झाल्यावर बारावीचे प्रमाणपत्रही मिळत असल्याने अनेक विद्यार्थी नोकरी करत असताना पदवीचे शिक्षणही पूर्ण करत असत. यामुळे रोजगाराभिमुख असलेल्या या शिक्षणाला विद्यार्थ्यांकडून मागणी होती. पण, शासन स्तरावरून या योजनेचा फारसा प्रचार व प्रसार होत नसल्यामुळे कालांतराने या अभ्यासक्रमासाठीची विद्यार्थी संख्या घटू लागली. सध्या असे शिक्षण देणार्‍या राज्यात सुमारे 1500 शिक्षण संस्था असून त्यांच्यात 81 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

या अभ्यासक्रमाच्या 70 टक्के जागा रिक्‍त आहेत. तसेच, शिक्षणात कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमांकडे जास्त कल असतो. यामुळे या अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल व्हावे या उद्देशाने तो आयटीआय किंवा ‘व्हीआयटी’मध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हे अभ्यासक्रम शिकविणार्‍या अनुदानित संस्थांचे रूपांतर आयटीआय किंवा व्हीआयटी अथवा पॉलिटेक्निकमध्ये करता येऊ शकेल. ज्या संस्था हे बदल करणार नाहीत तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दुसर्‍या संस्थांमध्ये सामावून घेतले जावे, असा प्रस्ताव आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.या वर्षीपासून या अभ्यासक्रमासाठी अकरावीचे प्रवेश घेण्यास मुभा नसेल, अशी शक्यता आहे.

रिक्‍त जागांचे प्रमाण वाढले...

गेल्या काही वर्षांमध्ये एमसीव्हीसी विद्यालयांमध्ये रिक्‍त जागांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासनाने ही योजना गुंडाळण्याचा विचार सुरू केला आहे. या विद्यालयांचे ‘आयटीआय’ किंवा ‘व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये (व्हीआयटी) रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात शिक्षक संघटना आणि संस्थाचालकांच्या काही बैठकाही झाल्याचे समजते.