Fri, May 24, 2019 07:13होमपेज › Konkan › अवैद्यकीय कर्मचार्‍याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 मे पासून साखळी उपोषण

अवैद्यकीय कर्मचार्‍याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 मे पासून साखळी उपोषण

Published On: Apr 28 2018 10:59PM | Last Updated: Apr 28 2018 10:49PMकणकवली ः शहर वार्ताहर 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात काम करणार्‍या अवैद्यकीय कामगारांच्या (कंत्राटी) करारात नमूद केल्याप्रमाणे किमान वेतन दिले जात नसून केवळ तुटपुंजे वेतन दिले जात आहे. करारात सुमारे 11 हजार 300 रु.वेतन या कर्मचार्‍यांना देण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांना चार ते पाच हजार एवढेच वेतन मिळत आहे. त्यामुळे मिळणार्‍या वेतनात मोठी तफावत असलल्याने  अवैद्यकीय कामागारांवर अन्याय होत आहे. तसेच अनेक मागण्यांसाठी अवैद्यकीय कर्मचारी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण छेडणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकारव्दारे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी दिली.

जिल्हयातील सर्व वाहनचालकांना वस्त्रे धुलाई व स्वच्छता कामगारांना किमान वेतन देण्याची तरतूद ठेकेदारासोबत केलेल्या करार पत्रकात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मान्य करून घेतली असतानाही किमान वेतन या कर्मचार्‍यांना मिळत नाही. याची चौकशी करून थकीत किमान वेतनाची रक्‍कम कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी. सर्वांना समान पगार देणे आवश्यक असून जिल्ह्यातील कामगारांचा ठेकेदार एकच असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रक्‍कम वेतन स्वरूपात दिली जात आहे. तसेच कामगारांना प्रॉव्हिडंट फंड मिळत नाही, तो कामगारांना मिळावा. तसेच ठेकेदारासोबत केलेल्या कराराप्रमाणे अवैद्यकीय कामगारांचा इन्शुरन्स उतरवलेला नाही तो तत्काळ काढावा. कामगारांना गणवेश व इतर साहित्य मिळावे.करार पत्रकानुसार अवैद्यकीय कामगारांना आवश्यक लाभ मिळत नाही. 

याबाबत चौकशी अधिकारी नेमून जिल्ह्यातील अवैद्यकीय कामगारांवरील अन्याय दूर करावा. या सर्व रास्त मागण्या पूर्ण न झाल्यास 1 मे पासून बेमुदत साखळी उपोषण छेडणार असल्याचा इशारा कास्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप कदम,अवैद्यकीय कर्मचारी जिल्हाध्यक्ष शशिकांत तांबे, जिल्हा सचिव सचिन तांबे यांनी दिला आहे.