Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Konkan › कोकणच्या विकासासाठी उपकारांची गरज नाही : उद्धव ठाकरे

कोकणच्या विकासासाठी उपकारांची गरज नाही : उद्धव ठाकरे

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 10:52PMवेंगुर्ले : प्रतिनिधी

कोकणात सध्या रिफायनरीचा विषय गाजत आहे. चांगले प्रकल्प गुजरातला नेले जातात आणि औष्णिक, रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारले जात आहेत. कोकणची राख व गुजरामध्ये रांगोळी असा प्रकार सध्या मोदी सरकारकडून सुरू असून निसर्गरम्य कोकणात अशा प्रकल्पांना शिवसेना थारा देणार नाही. ‘माझा कोकण’ पर्यायाने ‘माझा महाराष्ट्र’ उभारायला आम्ही समर्थ आहोत,तुमच्या उपकाराची गरज नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन 50 खाटांच्या इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ. वैभव नाईक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अरुण दुधवडकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, सभापती यशवंत परब, विधानसभा संपर्क प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख बाळा दळवी, वेंगुर्ले कार्यालयप्रमुख बाळा नाईक, सरपंच देवेंद्र डिचोलकर, शहरप्रमुख विवेक आरोलकर, आबा कोंडसकर, मनोहर येरम, अण्णा वजराठकर, सौ. सुचिता वजराठकर, सौ. सुकन्या नरसुले, रवींद्र नरसुले, रमण वायंगणकर, आर्किटेक्ट अजित जुवेकर, सौ. अनुश्री कांबळी, पंकज शिरसाठ, जिल्हा शल्यचिकित्सक ए.व्ही.कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्‍विनी माईणकर आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना पक्ष दिलेली आश्‍वासने  विसरणारा नाही तर ती पूर्ण करणारा पक्ष आहे. वेंगुर्ले शहराला जगप्रसिद्ध स्वर्गीय द्वारकानाथ कोटणीस यांच्या सेवाभावी वृत्तीचा वारसा आहे,अशा ठिकाणी आरोग्य सेवा दिली नाही तर लज्जास्पद गोष्ट ठरेल. आपले सरकार सत्तेत आहे तरीही पायाभूत सुविधांसाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागतात. त्यामुळे वेंगुर्ले येथे लवकरच द्वारकानाथ कोटणीस यांच्या नावाने आरोग्य सुविधा देणारे केंद्र सुरू केले जाईल.

या जिल्ह्याला कोट्यवधी रुपये सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आले आहेत तरीही या भागातील रुग्ण उपचारासाठी शेजारच्या गोवा राज्यात का नेले जातात असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित करत, कोकणात पर्यायाने सिंधुदुर्गात लेप्टो, मकडताप या रोगांनी थैमान घातले असून यातून सर्वसामान्यांचे प्राण वाचावेत यासाठी  जिल्ह्यात लवकरच सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालाय, अद्ययावत लॅब सुविधा लवकरच उभारली जाणार आहे. जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता असून ती भरून काढण्यासाठी जिल्ह्यातच डॉक्टर तयार व्हावेत यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उभारले जाईल आणि या सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी मी स्वतः येईन, अशी ग्वाही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

'तीन वर्षांपूर्वी वेंगुर्लेतील नागरिकांना दिलेला शब्द आरोग्यमंत्री दीपक सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज पूर्ण झाला असे यावेळी खा.विनायक राऊत यांनी सांगून  नियोजित रुग्णालयासाठी मंजूर असलेले दोनपैकी एक डॉक्टर हजर झाल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  या जिल्हा उपरुग्णालयाच्या बाजूलाच द्वारकानाथ कोटणीस यांच्या नावाने एक आयुर्वेदिक केंद्र सुरू करण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडची पहाणी केली. मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या सहसचिव रंजना नेवाळकर,संघटक अर्चना नाईक, भाग्यश्री दळवी,भारती गांवकर, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, बाळा नाईक, सुरेश भोसले, हेमंत मलबारी  यांच्यासह  शासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.