Wed, Apr 24, 2019 00:08होमपेज › Konkan › कणकवली मतदारसंघातील 100 शाळा होणार डिजिटल

कणकवली मतदारसंघातील 100 शाळा होणार डिजिटल

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 10:55PM

बुकमार्क करा

कणकवली ः प्रतिनिधी

शासनाकडून विकास निधी मिळो न मिळो तरी माझ्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील विकासप्रक्रिया आपण खोळंबू देणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मतदारसंघातील विकासकामे मी पूर्ण करणार आहे. कणकवली मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 100 शाळा, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल केल्या जाणार आहेत. तर वाभवे-वैभववाडी या शहराच्या विकास प्रक्रियेला सहकार्य म्हणून टाटा ट्रस्टने हे शहर दत्तक घेतले आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यक त्या नागरीसुविधा तेथील जनतेला उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती आ. नितेश राणे यांनी दिली. 

कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. राणे म्हणाले, सरकारच्या निधीवर अवलंबुन राहुन जनतेचा अपेक्षित विकास साध्य करता येत नाही. नुकतीच शासनाने 30 टक्के विकासनिधीला कात्री लावली आहे. त्यामुळे निधीची कमतरता प्रत्येक मतदारसंघात भासणार आहे. याचा विचार करुन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून जनतेला नागरी सुविधा द्याव्यात ही आपली संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाटा ट्रस्ट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, रिलायन्स, हिंदुजा अशा अनेक कंपन्या ज्यांना समाजसेवेसाठी सीएसआर फंड खर्च करावा असे शासनाचे निर्देश आहेत, या कंपन्यांशी मी गेले काही दिवस सातत्याने चर्चा करून विकासकामांसाठी सीएसआर फंड मिळावा म्हणून प्रयत्न सुरु होते. त्यानुसार टाटा ट्रस्टने कणकवली,देवगड,वैभववाडीचा सर्व्हे केला व पहिल्या टप्प्यात 100 शाळा डिजिटल करुन देण्याचे जाहीर केले आहे. अर्थातच 1 हजार शाळा डिजिटल करण्याचा आपला संकल्प आहे. ज्या शाळांना तातडीने डिजिटल करणे गरजेचे आहे अशा पहिल्या 100 शाळांचा शुभारंभ 26 जानेवारी 2018 रोजी केला जाणार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले.  

 वैभववाडी शहराला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टाटा ट्रस्टने हे शहर दत्तक घेतले आहे.  त्याचाही शुभारंभ 26 जानेवारीपासुन होईल. प्राण्यांवर उपचार, भटक्या जनावरांपासुन होणारा त्रास, शेतकर्‍यांना आपल्या प्राण्यांची योग्य काळजी घेता यावी, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे त्यासाठी प्राण्यांचे हॉस्पीटल उभारले जाणार आहे. हे हॉस्पीटल मतदारसंघातील कोणत्याही एका तालुक्यात उभे केले जाणार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये असला तरी ज्या ठिकाणी सरकार चुकेल त्या ठिकाणी आम्ही जनतेच्या हितासाठी आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

लवकरच रखडलेली भात खरेदी व अन्य प्रश्‍नांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.