रत्नागिरी ः प्रतिनिधी
कोकणात राष्ट्रवादीला नारायण राणे यांनी सांभाळले. मात्र, याची जाण न ठेवता नांदेड येथील सभेत अजित पवार यांनी राणेंविरोधात वक्तव्य केले. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीने अपेक्षित मदत केली नाही. त्यामुळे अजित पवार यांना राणेंची गरज किती आहे, हे दाखवून देण्यासाठी आगामी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य न करण्याची भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दिली.
येथे रविवारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. ते म्हणाले की, कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक 21 मे रोजी होत असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. गतवेळी राष्ट्रवादीचे अनिल तटकरे यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला होता. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांना फोन करून मदत करण्यास सांगितले होते. त्यावेळी आम्ही त्यांना मदतही केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली नाही. तरीही राणे यांनी राष्ट्रवादीबरोबर सहकार्याचीच भूमिका घेतली होती. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत अजित पवार यांनी राणेंवर बोचरी टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करतात. सिंधुदुर्गात आमच्या पक्षाचे 80 मतदार आहेत. हे मतदार तटस्थ राहिले तर काय होईल याचा अंदाज सुनील तटकरे यांनी घ्यावा. अजित पवार यांचे वागणे खपवून घेतले जाणार नसून, या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
काँग्रेसला उशीरा जाग येते
नाणार येथील प्रकल्प विरोधात प्रखर भूमिका मांडणारे अशोक वालम जेव्हा दिल्लीत गेले. तेव्हा काँग्रेस जागी झाली आणि त्यांचे शिष्टमंडळ राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले. पण दिल्लीला जाऊन काय उपयोग या शिष्टमंडळाने नाणारमध्ये येऊन येथील प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकले पाहिजे. काँगेसमध्ये प्रकल्प थांबवायची ताकद नाही, असेही निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
...मग मत्स्य महाविद्यालय संलग्नता ‘नागपूर’शी का करता?
नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी हा समुद्र किनार्यावरील प्रकल्प असल्याने विदर्भात आणणे शक्यच नाही. या भागात प्रकल्प आणावयाचा असल्यास आधी समुद्र आणावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मग जर तुमच्याकडे समुद्र नसेल, तर मत्स्य महाविद्यालय संलग्नता नागपूर विद्यापीठाशी का करता, असा प्रश्न नीलेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.