Wed, Jul 17, 2019 10:55होमपेज › Konkan › निवधेवासीयांना अद्यापही ‘डोली’चाच आधार!

निवधेवासीयांना अद्यापही ‘डोली’चाच आधार!

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:45PMसंगमेश्‍वर : वार्ताहर  

एका बाजूला डिजिटल इंडिया, कनेक्टिंग इंडियाचे ढोल बडवले जात असले तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील असंख्य गावांमध्ये पायाभूत सुविधा पोहोचल्या नसल्याचे विदारक वास्तव आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील निवधे गावातील कोणत्याही वाडीत जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने येथील आजारी माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी चक्क डोलीचा आधार घेण्याची वेळ येत आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या  निवधे गावाची लोकसंख्या 750 आहे. गावात कदमवाडी, चव्हाणवाडी, गुरववाडी, धनगरवाडी, गवळीवाडी, बडेवाडी अशा वाड्या आहेत. 1984 साली रोजगार हमी योजनेतून या गावात रस्ता झाला. मात्र, त्यावर डांबर कधीच पडले नाही. त्यामुळे आज गावातल्यांना अगदी रस्त्याने जायचे असेल तर 20 ते 25 किलोमीटरचा वळसा घालून आंबा घाटातून कळकदर्‍यातून यावे लागते. रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जंगलातून जावे लागते. 

गावातील आजारी माणसांचे हाल तर पहावत नाहीत. कोणत्याही वाडीत माणूस आजारी पडला की त्याला डोली बनवून त्यात बसवायचे. नदीचा अडथळा पार करीत 3 किमी पायपीट करून त्याला रूग्णालयात न्यायचे. उपचार झाल्यावर पुन्हा हीच कसरत करीत घरी परतायचे. ही कसरत ग्रामस्थांसाठी आता नेहमीचीच झाली आहे. या कसरतीत अनेकांना इथे जीव गमवावा लागलाय. याची चाड ना प्रशासनाला ना लोकप्रतिनिधींना. 

गेली अनेक वर्ष इथले ग्रामस्थ गावात रस्ता व्हावा, म्हणून धडपडताहेत. रस्ता कुणी करायचा यावरून सध्या वाद  सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणा इथे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेकदा इथल्या ग्रामस्थांनी उच्च पातळीपर्यंत रस्ताची मागणी केली. निवडणुका आल्या की आश्‍वासने मिळतात पण प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नाही. हे आमचे व लोकशाहीचे दुर्दैव आहे, असे उपसरपंच प्रवीण बेंद्रे सांगतात. हा प्रश्‍न सुटावा, अशी मागणी होत आहे.