होमपेज › Konkan › विधानसभेवर भगवा फडकवा : शिंदे

विधानसभेवर भगवा फडकवा : शिंदे

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 10:57PMकणकवली : प्रतिनिधी

शिवसेना नेहमीच जनतेसोबत असते. शिवसेनेला निवडणुकीची वेगळी तयारी करावी लागत नाही. ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रात नैसर्गिक अथवा इतर संकटे आली त्यावेळी जनतेच्या मदतीला धावून जाणारा हा शिवसैनिकच असतो. सर्वसामान्य शिवसैनिक हा शिवसेनेचे वैभव आहे. शिवसेना विकासाचे राजकारण करते. कणकवली विधानसभा मतदारसंघातही यश मिळविणे कठीण नाही, त्यासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची आहे. विधानसभेवर एकहाती भगवा फडकवणे हे शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते तथा  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निर्धार मेळाव्यात केले.

कणकवली विधानसभेचा शिवसेनेचा निर्धार मेळावा शनिवारी सकाळी येथील मातोश्री मंगल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, आ. रवींद्र फाटक, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी संपर्कप्रमुख मधुकर राऊत, महिला जिल्हा आघाडीप्रमुख सौ. जान्हवी सावंत, सौ. स्नेहा तेंडुलकर, कणकवली संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि.प.सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ना.एकनाथ शिंदे म्हणाले, कोकणने शिवसेनेला भरभरून दिले आणि शिवसेनाही कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. शिवसेनेमुळेच सर्वसामान्य शिवसैनिक ते कॅबिनेटमंत्री अशी पदे आपण भुषवू शकलो. असे शिवसेनेतच घडू शकते. आज महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांना वाली म्हणून शिवसेनेकडेच जनता पाहत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळेच शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली. आम्ही सत्तेत असलो तरी सत्तेसाठी हापापलेलो नाही. ज्या ज्यावेळी जनतेचे प्रश्‍न निर्माण होतील त्यावेळी शिवसेना जनतेसोबत असते. शिवसेनेचा जन्म हाच जनतेसाठी झाला आहे, असे सांगत ना.शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. ज्यांना शिवसेनेने सर्वोच्च पदे दिली ते मात्र आपण म्हणजेच शिवसेना असे समजायला लागले. त्यांना शिवसेनेने धडा शिकविला. शिवसेना संपविण्याची भाषा करणार्‍यांनी लक्षात ठेवावे त्यांच्या सात पिढ्या आल्या तरी शिवसेना कुणीही संपवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पात सिंधुदुर्गच्या कृषि आणि पर्यटन विकासासाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले. जिल्हा नियोजनचा आराखडा 190 कोटींवर गेला आहे. केवळ निधी मिळाला म्हणजे झाले असे नाही तर त्या निधीचा विनियोग योग्य रितीने होतो आहे की नाही हे शिवसैनिकांनी पहायला हवे.  बेकायदेशीररित्या वाळू उपसणार्‍या माफियांना सोडणार नाही. त्यांना योग्य ते शासन केले जाईल, असा इशारा ना.केसरकर यांनी दिला.

खा.विनायक राऊत यांनीही नारायण राणेंवर सडकून टीका केली. शिवसेनाच खर्‍या अर्थाने कोकणला न्याय देईल, असे सांगत त्यांनी सिंधुदुर्गसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल ना.केसरकर यांचे अभिनंदन केले. आ.वैभव नाईक यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातही सेनेची ताकद वाढत असून ना. शिंदे आणि ना. देसाई यांनी आम्हाला ताकद दिली तर कणकवली विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवू असा विश्‍वास व्यक्‍त केला. अरूण दुधवडकर यांनी कणकवली मतदारसंघात शिवसेनेला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. या मेळाव्यात वागदेचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याला मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.