रत्नागिरी : प्रतिनिधी
‘वायू’ वादळाचा प्रभाव संपल्यानंतर जून महिन्याच्या दुसर्या पंधरावड्यात सक्रीय होणार्या मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू असताना आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टी भागातील जिल्हा प्रशासनांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने याबाबत खबरदारी घेताना किनारपट्टी भागात सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
जून महिन्यात अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. दि. 10 जून ते 13 जून या कालावधीत वदळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसण्याच अंदाज होता. मात्र, वायूचा रोख गुजरातकडे सरकल्यानंतर धोका टळला होता. दरम्यानच्या काळात बिगर मोसमी पावसाने कोकण किनारपट्टी भगात राबता वाढविला होता. मात्र, त्यामध्ये सातत्य नव्हते. वायू वादळाने मोसमी पावसाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याने कोकणात पौर्णिमेपासून मोसमी पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज होता. मात्र, त्यामध्येही सातत्य
नव्हते.
वटपौर्णिमेनंतर 15 ते 19 जून या कालावधित जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. मात्र, तुरळक सरींचा अपवाद वगळता गेल दोन दिवस कोरडेच गेले. त्यामुळे आता मोसमी पाऊस सक्रीय होण्याची प्रतीक्षा वाढली आहे. शुक्रवारीही जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. पावसाचा हा प्रभाव 24 जूनपर्यंत राहण्याची अटकळ वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुसार प्रशासनांनी खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.