Tue, Jul 16, 2019 12:19होमपेज › Konkan › नवीन वर्ष एसटीच्या परिवर्तनाचे : ना. रावते

नवीन वर्ष एसटीच्या परिवर्तनाचे : ना. रावते

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:37PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

नवीन वर्ष हे एसटीच्या परिवर्तनाचे वर्ष असून या वर्षात कार्यान्वित होणार्‍या विविध प्रवासी व कर्मचारीभिमुख योजनांमुळे  एसटीचा व एसटीच्या प्रवासी सेवेचा कायापालट झालेला दिसेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले. 

शनिवारी  मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयात कर्मचार्‍यांना नवीन तयार गणवेश वितरण सोहळा व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त ना. रावते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ना. रावते यांनी पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचार्‍यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मांडली. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणार्‍या राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थान या संस्थेला एसटी कर्मचार्‍यांना नवीन गणवेश डिझाईन तयार करण्यासाठी पाचारण केले. या संस्थेने एसटी कर्मचार्‍यांशी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधून, त्यांच्या कामाचे स्वरूप, गरजा, स्थानिक हवामान याचा विचार करून नवीन गणवेशाचे प्रारूप तयार केले.त्यानंतर सर्व कामगार आणि संघटनांशी चर्चा करून सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक कर्मचार्‍याला वर्षातून दोन गणवेश दिले जाणार, अशी माहिती एसटीच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली.