Tue, Apr 23, 2019 08:11होमपेज › Konkan › खासगी क्लाससाठी नवा कायदा

खासगी क्लाससाठी नवा कायदा

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:06PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

खासगी कोचिंग क्लासद्वारे होणारी विद्यार्थ्यांची पिळवणूक रोखण्याकरिता राज्य सरकार नवा कायदा आणणार आहे. या कायद्याचा मसुदा या संबंधीच्या समिती सदस्यांकडे पाठविण्यात आला आहे. या मसुद्यानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या क्लासना नोंदणी बंधनकारक करण्याबरोबरच वर्गखोल्या, विद्यार्थीसंख्या तसेच पायाभूत सुविधा पुरविणे आणि आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आरक्षण आदी बाबींचा या मसुद्यात समावेश आहे. 

राज्यभर पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत खासगी क्लासचे पेव फुटले आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने यापैकी बहुतांश क्लासचालकांकडून विद्यार्थी, पालकांची पिळवणूक केली जात आहे. याबाबत शिक्षणतज्ज्ञांनी खासगी क्लाससाठी सर्वंकष कायदा तयार करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

खासगी क्लासवर नियंत्रण आणण्यासंदर्भात सरकारने 12 सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीच्या बैठकांनंतर हा कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे. यासंबंधीचा मसुदा शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या स्वाक्षरीने बारा सदस्यांकडे विचारविनिमयासाठी पाठविण्यात आला आहे. हा कायदा महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम 2018 या नावाने ओळखण्यात येईल. हा कायदा पहिली ते बारावीपर्यंतच्या खासगी शिकवण्यांना लागू असेल. 

शाळेच्या वेळेत कोणताही क्लास घेता येणार नाही. क्लासमध्ये शिकवणार्‍या शिक्षकाकडे शैक्षणिक पात्रतेबरोबरच अध्यापन कौशल्यही आवश्यक आहे. या मसुद्यानुसार क्लासचे शुल्क ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारने नेमलेल्या समितीद्वारे निश्‍चित होईल. त्यापेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही. त्याचबरोबर हे शुल्क रोख स्वरूपात स्वीकारता येणार नाही. हे शुल्क बँक खात्यामध्येच भरावे लागणार आहे. घरगुती शिकवणीसाठी कमाल पाच, तर क्लाससाठी कमाल 80 विद्यार्थ्यांची मर्यादा लागू असेल. 

क्लास चालवताना मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पार्किंग व प्रतीक्षालय; तसेच स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी या सुविधा आवश्यक राहतील. टेस्ट सीरिज, ऑनलाईन कोचिंग, संगीत, चित्रकला, शिल्पकला, मेहंदी, रांगोळी, शिलाईही या अधिनियमाच्या कक्षेत समाविष्ट आहेत.