Mon, Apr 22, 2019 04:01होमपेज › Konkan › नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा

नवीन इमारतीचा प्रशासनाने घेतला ताबा

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 10:08PM

बुकमार्क करा
देवरूख : वार्ताहर 

गेले वर्षभर सातत्याने आयटीआय नागरिक संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर संगमेश्‍वरातील आयटीआयची नवीन इमारत आयटीआय प्रशासनाने ताब्यात घेतल्याने संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले आहे. दि. 5 जानेवारीपासून बांधकाम विभागाने रितसर या इमारतीचा ताबा आयटीआय प्रशासनाकडे दिल्याचे जाहिर केले.

तातडीने आयटीआय प्रशासनानेही आपल्या जुन्या इमारतीमधील सामान नव्या इमारतीत हलविण्यास सुरवात केल्याने संगमेश्‍वरवासियांनी समाधान व्यक्‍त केले आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संगमेश्‍वरच्या आयटीआय नवीन इमारतीचा स्थलांतराचा प्रश्‍न गेले दीड वर्षे गाजत होता. मूळ निविदेपेक्षाही जास्त काम होऊनही काही कामे रखडल्याचे दाखवत ही इमारत ताब्यात घेण्यास आयटीआय प्रशासन राजी होत नव्हते. या प्रश्‍नात सामाजिक कार्यकर्ते गणेश चाचे यांनी उडी घेतली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, राजकीय प्रतिनिधी, पत्रकार यांना एकत्र करीत त्यांनी आयटीआय नागरिक संघर्ष समिती स्थापन केली. यानंतर जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, मंत्रालय अशा स्तरावर पोहचून त्यांनी या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्‍न मांडला. मात्र, तरीही मुजोर प्रशासन दाद देत नसल्याचे पाहून चाचे यांनी गतवर्षी भर पावसात संगमेश्‍वरात कुटुंबियांसह जनजागृती आंदोलन सुरू केले. यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी निषेध आंदोलनाचीही तयारी सुरू केली होती. 

यानंतर आयटीआय प्रशासनाने बांधकाम विभागाशी सल्‍लामसलत सुरू केली होती. बांधकाम विभागाने नावडी ग्रामपंचायतीच्या सहाय्याने येथील पाणी प्रश्‍न मार्गी लावला तर रस्ता आणि विजेचाही प्रश्‍न मार्गी लागला होता. आधी इमारत ताब्यात घ्या, मग शिल्‍लक कामे पूर्ण करून देतो असे आश्‍वासन बांधकाम विभागाने दिले होते होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत हालचाली होऊन आयटीआय प्रशासनाने ही इमारत ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार  दि. 5 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे आयटीआयचे प्राचार्य यांच्याकडे या इमारतीचे हस्तांतरण केले आणि आयटीआय प्रशासनानेही ही इमारत ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.

या प्रकारामुळे संघर्ष समितीचा गेले दीड वर्षे सुरू असलेला लढा आता थांबणार आहे. येत्या काही दिवसांत सामानाची हलवाहलव करून नव्या इमारतीचे उद्घाटन करीत येथे नवीन अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी जाहीर केले.