Thu, Apr 25, 2019 03:47होमपेज › Konkan › जलसंवर्धन न केल्यास स्थलांतर अटळ : नाना पाटेकर

जलसंवर्धन न केल्यास स्थलांतर अटळ : नाना पाटेकर

Published On: Apr 21 2018 11:15PM | Last Updated: Apr 21 2018 10:55PMकणकवली : प्रतिनिधी

जीवन व प्रगतीसाठी ‘पाणी’ हा सर्वात महत्वाचा घटक आहे. यासाठी जलसंवर्धन अत्यावश्यक आहे, अन्यथा एक दिवस स्थलांतरण करण्याची वेळ आपल्यावर येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

ग्रामविकास मंडळ नाटळ, रामेश्‍वर-माऊली मित्रमंडळ ग्रामस्थांच्या पुढाकाराने तसेच ‘नाम’ फाऊंडेशनच्या सहकार्याने गावात सुरू केलेल्या ‘नदी पुनर्जीवन’ उपक्रमाचा शुभारंभ नाना पाटेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अशा उपक्रमांसाठी केवळ एकजुटीची नव्हे तर संघटीत त्यागाची गरज आहे. आजची तरूण पिढी नक्कीच कष्टाळू आहे. या पिढीने आज त्याग केला तर भावी पिढीचे आयुष्य सुखकर होईल.

आपल्या पुर्वजांनी जलसंवर्धनासाठी अनेक पध्दती राबविल्या, कामे केली, पण काळाच्या ओघात ती मागे पडली आहेत. नदी म्हणजे गावाची जीवन वाहिनी आहे. तिचे अस्तित्व टिकवा, शेतीच्या रूपाने गावात नंदनवन फुलवा. जात-पात, गट-तट, लहान-मोठा असा भेदभाव न करता एकोप्याने ही चळवळ पुढे न्या, प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर विसंबू नका, प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रगतीचा आलेख वाढेल पण नोकर्‍या जातील, अशावेळी गावाकडील शेतीच आपल्याला आधार देईल. ही शेती टिकविण्यासाठी पाणी महत्वाचे आहे हे जाणा, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले.

नाम फाऊंडेशन ही संस्था उद्योगपतींच्या नव्हे तर सर्वसामान्य कष्टकर्‍यांच्या घामातून उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले. आ.नितेश राणे यांनी या नदी सुधार प्रकल्पाचे कौतुक केले. अशा जनताभिमूख विकासकामांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. नाम फाऊंडेशनचे काम निस्वार्थी असल्याचे कौतुक त्यांनी केले. या नदी सुधार उपक्रमासाठी त्यांनी 
एक लाख रूपयांची देणगी जाहीर केली.

माजी आ. पुष्पसेन सावंत म्हणाले, गाळयुक्त नद्या ही कोकणातील सर्वच गावांची समस्या आहे. असे उपक्रम राबविण्यासाठी लोकसहभाग नव्हे तर लोकचळवळ आवश्यक असल्याचे सांगितले. युवा नेते संदेश पारकर यांनी कोकणातील नद्या गाळयुक्‍त करण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. देवस्थानप्रमुख आप्पाजी सावंत यांच्या हस्ते नाना पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ग्रामविकास मंडळाचे सचिव अनिल सावंत यांनी केले.

सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, सरपंच सौ. सुजाता सावंत, जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नाम फाऊंडेशनचे राजू सावंत, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्‍वनाथ सावंत आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.