Mon, Jan 27, 2020 11:53होमपेज › Konkan › महाडजवळील वहुर येथे  पकडले 'गोमांस'   

महाडजवळील वहुर येथे  पकडले 'गोमांस'   

Published On: Jun 22 2018 12:07PM | Last Updated: Jun 22 2018 12:07PM महाड : प्रतिनिधी  

महाडपासून सहा किलोमीटर अंतरावर असणार्‍या वहुर गावच्या हद्दीमध्ये एका खासगी जागेत गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमध्ये दोन युवकांना गोमांसासमवेत पकडण्यात आले व अन्य दोन जण पळून गेल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  गिरी यांनी दिली आहे.   शासनाने गोमांस विक्री करण्यास बंदी केली असून  याप्रकरणी महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कलम यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पाच गाई सापडल्‍याने खळबळ

 यासंबधी सहाय्‍यक पोलिस निरीक्षक  पंकज गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी रात्री  मिळालेल्या माहितीच्या आधारे वहुर परिसरामध्ये पोलिसांनी  केलेल्या कारवाईमध्ये मुंबई येथील राहणाऱ्या दोन युवकांना गोमांस सहित पकडले. येथील तनवीन झटाम यांच्या घराच्या मागील बाजूस असणार्‍या झाडीमध्ये   हे युवक गायीचे मांस काढत असल्‍याचे आढळून आले. या कारवाईमध्ये दोघांना पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले तर  दोघांनी पलायन केल्याची माहिती गिरी यांनी दिली.  घटना स्थळावरून अन्य पाच गाई जप्त करण्यात आल्‍या आहेत.

.एक स्विफ्ट कारसह दोघे जण ताब्‍यात, दोघांचे पलायन

 पोलिसांनी याप्रकरणी अफजल मोईउद्दीन शेख, राहणार  शिवाजीनगर,  मुंबई व गोकुळ हुसेन इस्माईल शेख, राहणार चिखलवाडी,  शिवाजीनगर, मुंबई यांना ताब्यात घेतले.  घटनास्थळावरून एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. अन्य दोन पळून गेलेल्या युवकांचा तपास चालू आहे. 

आंतरराज्य टोळी असल्‍याचा पोलिसांचा संशय 

 गेल्या सहा महिन्यात महाड तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून गायी व म्हैशी यांच्या चोरी  करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी पाचाड येथील घटनेबाबत महाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.   तालुक्यातून गोवंश जातीची जनावरे घेऊन जाऊन त्यांचे मांस विकणारी आंतरराज्य टोळी असल्‍याचा पोचलसांनी संशय व्‍यक़्‍त केला आहे.   या टोळीचे स्थानिकांशी काही संबंध आहेत का,  याबाबत तपास करणार असल्याची माहिती गिरी यांनी दिली.