Mon, Aug 19, 2019 09:37होमपेज › Konkan › राष्ट्रवादीच्या विजयाने गीतेंना चपराक : तटकरे

राष्ट्रवादीच्या विजयाने गीतेंना चपराक : तटकरे

Published On: May 24 2018 10:30PM | Last Updated: May 24 2018 9:51PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अ‍ॅड. राजीव साबळे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झाले आहेत. प्रतिकुल परिस्थितीतही राष्ट्रवादीने हा विजय प्राप्त केल्याने केंद्रीय ऊर्जामंत्री अनंत गीते यांना चपराक बसली असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आपण कोणावर टीका करत नसून विजयाचा नम्रपणे स्वीकार करत असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव करून विजयश्री मिळवली आहे. कोकणातून शिवसेनेला विजयाची अपेक्षा होती. मात्र, नारायण राणे आणि भाजपने अनिकेत तटकरेंना मदत करण्याचे धोरण अवलंबिल्याने तटकरेंचा विजय सुकर झाला. भाजप व राणेंकडे सुमारे दीडशे ते दोनशेच्या घरात मते होती. ती मते एकगठ्ठा तटकरेंना गेल्याने 952 पैकी तब्बल 620 इतकी मते तटकरेंना मिळाली तर राजीव साबळेंना केवळ 306 मते मिळाली. भाजप व राणेंमुळे तटकरेंनी तब्बल 314 मतांनी विजय खेचून आणला. त्यांना शेकापचीही मदत मिळाली. हा विजय पक्षाध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष व तटकरे कुटुंबियांना नेहमी सहकार्य करणार्‍या कोकणवासियांना समर्पित केल्याचे यावेळी सुनील तटकरे म्हणाले. 

प्रत्यक्षात कागदावर राष्ट्रवादीचे 174 मते असताना 620 मते मिळाली. यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, राज ठाकरे आणि स्थानिक नेत्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याचबरोबर काही शिवसैनिकांनीही अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे त्यांनी सांगितले. अनंत गीते यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दलबदलूंना उमेदवारी दिली होती. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्यांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला असल्याचेही ते म्हणाले. 

यावेळी अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपल्या वडिलांनी मोठे कार्य केले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेकांना आपल्यासोबत जोडले आहे. यापुढे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करणार आहे.यावेळी आम. हुस्नबानू खलिफे, शेखर निकम, उमेश शेट्ये आदी उपस्थित होते.