Fri, Jan 24, 2020 23:04होमपेज › Konkan › शपथ घेण्यास लावणार्‍या गीतेंचा सैनिकांवर भरवसा नाही काय?

शपथ घेण्यास लावणार्‍या गीतेंचा सैनिकांवर भरवसा नाही काय?

Published On: Mar 14 2019 2:04AM | Last Updated: Mar 13 2019 11:36PM
खेड : प्रतिनिधी

अनंत गीते काही दिवसांपासून शिवसैनिकांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना शपथ घेण्यास लावत आहेत. हे म्हणजे शिवसैनिकांच्या स्वाभिमानावर शंका उपस्थित केल्यासारखे असून गीते तुमचा शिवसैनिकांवर भरोसा नाय काय, असा खोचक सवाल आघाडीचे रायगड मतदार संघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी येथे उपस्थित केला. बुधवार दि.13 रोजी खेड शहरातील द.ग.तटकरे सभागृहात राष्ट्रवादीच्या गुहागर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

खेड शहरातील द. ग. तटकरे सभागृहात बुधवार दि.13 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे, गुहागरचे आ. भास्कर जाधव, चित्रा चव्हाण, शौकत मुकादम, ग. रा. चिकणे, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, जि.प. विरोधी गटनेते विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य सिद्धी पवार, अजय बिरवटकरआदींसह पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव  म्हणाले,  अनंत गीते तीस वर्षे समाजाचा वापर करून निवडून येत आहेत. परंतु त्यांनी समाजासाठी काहीही केलेले नाही. रामदास कदम आमदार होते तेव्हा ज्या धरणांची कामे झाली व आता जे होत आहेत त्याचे ठेकेदार कोण होते व आहेत याचा खुलासा त्यांनी करावा. 

यावेळी सुनील तटकरे म्हणाले, निवडणुका येतील जातील. परंतु समाजकारण करताना सामान्य माणसावर होणारा अन्याय पाहून पेटणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे लोटे येथील हिंसाचार प्रकरणानंतर सामान्य माणसावर होणारा अन्याय पाहून सत्तेतील लोकांनी जी भूमिका त्यावेळी घेतली व आता जे या विषयाचे हिणकस राजकारण करू पाहात आहेत त्याचा पर्दाफार्श भास्कर जाधव यांनी केला आहे. 

सध्या सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांना देशदोही ठरवण्याचे काम सुरू आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या गीतेंनी पाच वर्षांत विकासाची संधी असताना देखील 25 वर्षे कोकणाला पाठीमागे नेण्याचे काम केले आहे.

अवजड उद्योगमंत्री पद असताना देखील कोकणातील जनतेला विकासाच्या नावाखाली भ्रमनिरास झाला आहे. गीतेंनी समोरासमोर येऊन केलेल्या कामांची माहिती द्यावी असे अव्हान तटकरेंनी या कार्यकर्ता मेळाव्यात दिले.

..तर सर्वांनाच जामीन द्या : आ. जाधव

लोटे हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचे नाव आरोपींच्या यादीत 38 व्या क्रमांकाला आहे. ते मंत्र्यांसोबत फिरताहेत आणि पोलिस लोटे पंचक्रोशीतील महिलांना घरांमध्ये घुसून त्रास देत आहेत. एकतर सचिन कदमांना अटक करा नाहीतर लोटे प्रकरणात गुन्हे नोंद झालेल्या सर्व आरोपींना जामीन मंजूर करा, अशी मागणी गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी जाहीर सभेत केली.