होमपेज › Konkan › ‘राष्ट्रीय पेयजल’च्या ६७ योजनांचा मार्ग मोकळा

‘राष्ट्रीय पेयजल’च्या ६७ योजनांचा मार्ग मोकळा

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 10:52PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

शासनाने तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांना स्थगिती दिली होती. त्याचा फटका जिल्ह्यातील 67 नळपाणी योजनांना बसला होता. यामुळे 67 पाणी योजना अडकल्या होत्या. त्या राबविण्यास आदेश प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. 

जिल्ह्यातील डोंगराळ भागासह गाव आणि वाड्यांची तहान भागवण्यासाठी नवनवीन योजना हाती घेण्यात आल्या. 2004 मध्ये नळपाणी योजना वेगवेगळ्या नावाने राबवण्यात आल्या. केंद्र शासन, राज्य शासनाने निधी दिल्यानंतर या योजनेला मंजुरी घेऊन त्या राबवण्यात येत होत्या. सर्वात आधी जलस्वराज्य यानंतर भारत निर्माण आणि नंतर राष्ट्रीय पेयजल या नावाने नळपाणी योजना राबवण्यात आल्या. राष्ट्रीय पेयजल योजना 3 वर्षांपूर्वी ठप्प झाली. आता स्थगिती उठवल्याने दिलासा मिळाला आहे. यामध्ये मंडणगडमधील 1, दापोली 4, गुहागर 5, खेड 4, लांजा 10, चिपळूण 2, संगमेश्‍वर 19, रत्नागिरी 12 आणि राजापूर तालुक्यातील 9 योजनांचा समावेश आहे. शासनाकडून टप्प्याटप्प्याने त्याला निधी पुरवला जातो. 

पेयजलमधील सुमारे पाचशे पाणी योजनांची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. निधीच खर्ची पडत नसल्यामुळे 29 जून 2017 ला शासनाने नवीन योजना मंजुरीला स्थगिती दिली होती. त्यात मंजुरीच्या स्थितीत असलेल्या योजनांचा समावेश केला होता. 

दुसर्‍या, तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या कामांना प्राप्त झालेला निधी पुरवठा करावा, अशा सक्‍त सूचनाही दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील 67 योजना रखडल्या. 9 कोटी 18 लाख 45 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. 2015 नंतर आजतागायत पेयजलमधून नवीन योजनाच हाती घेण्यात आलेल्या नाहीत. निधी मिळत नसल्याने जि.प.ने जुन्या योजनांची पूर्तता करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत सव्वाशेहून अधिक योजना पूर्ण झाल्या असून ग्रा.प.कडे शिल्लक निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करवून घेण्यात आला आहे.