Thu, Nov 15, 2018 09:31होमपेज › Konkan › गावठी आठवडा बाजारात नारायण राणेंची भेट

गावठी आठवडा बाजारात नारायण राणेंची भेट

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:34PMकणकवली : वार्ताहर 

सिंधुदुर्गात लक्षवेधी ठरत असलेल्या कणकवलीतील गावठी आठवडा बाजाराला शुक्रवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी भेट दिली. राणे यांनी सपत्नीक खरेदीचा आनंद घेतानाच गावठी बाजार आयोजकांचे कौतुक केले. खेड्यापाड्यातील शेतकर्‍यांना गावठी बाजाराचा निश्‍चितपणे फायदा होणार आहे. गावठी बाजार अधिक व्यापक पध्दतीने भरविला जावा, असे राणे यांनी सांगितले.

कणकवली पंचायत समिती व स्नेहसिंधु कृषि पदवीधर संघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने कणकवली जि.प.बांधकाम उपविभागाच्या आवारात शुक्रवारी झालेल्या तिसर्‍या आठवडा बाजाराला भेट देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी ग्रामीण भागातून शेतकर्‍यांनी आणलेल्या विविध वस्तुंची खरेदी केली. सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, कणकवलीच्या सभापती भाग्यलक्ष्मी साटम, हेमंत सावंत, पंकज दळी, सुरेश सावंत, संदीप राणे, किशोर राणे, मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. 

गावठी आठवडा बाजारामध्ये मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकर्‍यांनी जळणासाठी लाकडे, गोवर्‍या, गावठी तांदूळ, पालेभाजी, झुणकाभाकर, वडेसागोती, लाडू, पीठ, नारळ, कोकम, केरसुन्या, मातीची भांडी अशा विविध वस्तू आणल्या होत्या. नागरिकांच्या प्रतिसादामुळे काही तासातच या वस्तूंची विक्री झाली.