Mon, May 20, 2019 22:44होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’च्या प्रचाराचा नारळ आज फुटणार!

‘स्वाभिमान’च्या प्रचाराचा नारळ आज फुटणार!

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:24PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आणि सौ. नीलम राणे व आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत ढालकाठी येथे केले जाणार आहे. तर सायंकाळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवली शहराच्या वतीने आयोजित ‘मास्टरशेफ कणकवली- 2018’ या स्पर्धेचे उद्घाटनही नारायण राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगरसेवक आणि माजी उपनराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच पक्षातर्फे कणकवली नगरपंचायतीची निवडणूक लढविली जात आहे. त्यामुळे उमेदवार निश्‍चिती व अन्य बाबींबाबतचा निर्णय पक्षाचे संस्थापक नारायण राणे घेणार आहेत. येत्या काही दिवसांत कणकवली न. पं. निवडणुकीचा बिगूल वाजणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. शनिवारी ढालकाठी येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होत असून प्रचाराचा नारळ यावेळी फोडला जाणार आहे. यावेळी नारायण राणे काय बोलणार याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता लागली आहे. 

सायंकाळी ‘मास्टरशेफ कणकवली 2018’ या स्पर्धेचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते गणपतीसाना येथे होणार आहे. यावेळी मुंबईतील प्रख्यात शेफ तुषार देशमुख यांच्या तीन लाईव्ह रेसिपीज् पाहण्याची संधी कणकवलीकरांना मिळणार आहे. स्पर्धेतील विजेतीला सोन्याचा हार, उपविजेतीला सोन्याची कणर्र्फुले आणि तृतीय विजेतीला सोन्याची अंगठी अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास इतर बक्षिसे आणि प्रेक्षकांसाठीही मोफत लकी ड्रॉ असणार  आहे. या स्पर्धेला आ. नितेश राणे, सौ. नीलम राणे उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.