Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Konkan › गजानन महाराज प्रकटदिनासाठी भाविकांचे लोंढे

गजानन महाराज प्रकटदिनासाठी भाविकांचे लोंढे

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:19PMनाणीज  : वार्ताहर

येथील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर भाविकांचे लोंढे येत आहेत. त्यामुळे गडही शोभिवंत बनला आहे. निमित्त आहे ते संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकटदिन व जगद‍्गुरू रामानंदाचार्य यांच्या जयंती उत्सवाचे. मंगळवारी याग व निमंत्रण मिरवणुकांमुळे सोहळा सुरू होईल. बुधवारची शोभायात्रा भाविकांसाठी आनंदपर्वणी असेल.  संतशिरोमणी गजानन महाराज जगद‍्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे उपास्य दैवत आहे. त्यातून  संस्थानर्फे या 7 फेब्रुवारीला संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व जगद‍्गुरू रामानंदाचार्य महाराज यांचा जयंती सोहळा होत आहे. दि.6 फेब्रुवारीला त्याची सुरूवात श्री विष्णू पंचायतन यागाने होईल. वे.श.स. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

प्रकटदिन सोहळ्याचे देवदेवतांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचे यजमानपद वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सेवासमित्यांवर सोपवले आहे. नाथांचेमाहेर मंदिराच्या निमंत्रणाचे यजमानपद पश्‍चिम पालघर जिल्हा सेवा समितीकडे आहे. वरद 
चिंतामणीला निमंत्रण देण्याचे  यजमानपद लातूर जिल्हा सेवा समितीकडे आहे. भगवान प्रभू श्रीराम मंदिराचे यजमानपद  ठाणे शहराकडे आहे. सुंदरगडावरील मुख्य श्री संतशिरोमणी गजानन महाराज मंदिराचे यजमानपद पूर्व व पश्‍चिम जळगावकडे आहे. या मिरवणुकांत इतरही भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत  असतात.

 बुधवारी 7 फेब्रुवारी हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी सर्वांचे आकर्षण असलेली शोभायात्रा निघणार आहे. त्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश येथील लोककला व कलाकार सहभागी होणार आहेत. एका अर्थाने आपली संस्कृती पाहण्याची संधी यानिमित्ताने भाविकांना मिळणार आहे. सकाळी आठ वाजता ही यात्रा नाथांचे माहेर येथून सुरू होणार आहे. दुपारी सुंदरगडावर त्याचा समारोप  होईल. याच दिवशी रात्री 7 वाजता प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन आहे. त्यानंतर 8.30 वाजता जगद‍्गुरू नरेंद्राचार्य महाराज याचे अमृतमय प्रवचन होईल. सोहळ्याच्या दोन्ही दिवस भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सोहळ्यासाठी भाविक येण्यास सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने दोन दिवस चैतन्याचे दर्शनच गडावर होणार आहे.

उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दूरचे लोककलाकार येथे आले आहेत. मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व जण सुंदरगडावर दाखल होतील. यावेळी सुंदरगडावर विविध कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रमही राबविले जाणार आहेत. संस्थानतर्फे नित्यनेमाने जसे उपक्रम राबविले जातात, तसे यापुढेही राबविण्यात येणार आहेत. संस्थांच्या सामाजिक उपक्रमामुळे अनेकांना मदत लाभली आहे. त्यामुळे या अशा कार्यक्रमांना गर्दीचा उच्चांक असतो. सामाजिक उपक्रम आणि वारी उत्सव यामुळे नाणीजक्षेत्री भाविकांचा पूर येतो.