होमपेज › Konkan › गॅरेजला आग; लाखोंचे नुकसान

गॅरेजला आग; लाखोंचे नुकसान

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 1:20AMनाणीज : वार्ताहर

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पाली तिठ्यानजीक असलेल्या एका मोटार गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत गॅरेजसह हार्डवेअरचे गोडावून जळून खाक झाले. या दोन्हीही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग सोमवारी रात्री 11 वा. च्या सुमारास लागली. मात्र, पालीतील शेकडो तरुणांनी प्रसंगावधान राखून या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पाली तिठ्यानजीक अनंत पालकर यांची लाकडाची वखार आहे. या वखारीच्या शेजारीच गेली 8 वर्षे मलकापूर (जि. कोल्हापूर) येथील मंगेश सत्तू पाटील यांचे गॅरेज आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे पाटील हे सायंकाळी 7 वा. गॅरेज बंद करून घरी निघून गेले. यानंतर रात्री 11 च्या सुमारास त्यांच्या गॅरेजमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, आगीचा मोठा लोळ दुकानातील पत्रे उडवून उंच गेला. या घटनेनंतर आजुबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. घटनास्थळी सॉ-मिलच्या ठिकाणी वैभव पालकर यांचे घर आहे. या घरातील लोकही स्फोटानंतर भयभीत झाले. या घरातील मंडळींनी तत्काळ या घटनेची माहिती गॅरेज मालकांना दिली. तोपर्यंत पालीतील तरुणांचा फौजफाटा  मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाला होता. 

आगीनंतर गॅरेजमधील  बॅटर्‍यांचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुर्घटनाग्रस्त गॅरेजवळच राजेश पटेल यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांचे हार्डवेअरचे गोडावून या गॅरेजच्या मागे असल्याने तेथील प्लायवूड, पाण्याच्या टाक्या, दरवाजे यांनी पेट घेतल्याने आग अधिकच भडकली. मात्र, पालीतील शेकडो तरूणांनी रौद्ररूप घेतलेल्या आगीवर पाण्याचा मारा करीत तिच्यावर नियंत्रण मिळवले.

याचदरम्यान पाली पोलिसांनी तत्काळ रत्नागिरी न.प. कडे संपर्क साधून अग्निशामक बंब मागवला. अर्ध्या तासाने अग्निशामक बंब आल्यावर उर्वरित आगीवर बंबाच्या सहाय्याने पूर्णणे नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोन्हीही दुकाने   जळून खाक झाली होती. रात्री 1 वा. च्या सुमारास या आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या घटनेचा महसूल विभागाकडून  पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच मंगेश पांचाळ, ग्रामविस्तार अधिकारी कुंभार, लहू घगवे उपस्थित होते. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात पाटील यांच्या गॅरेजचे 1 लाख 18 हजार 920 रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. या या आगीत पटेल यांच्या हार्डवेअर गोडावूनचे 1 लाख 14 हजार 800 रूपयांचे नुकसान झाले आहे.