Tue, Mar 26, 2019 08:28होमपेज › Konkan › नाणारसंदर्भात शिवसेनेचा 31 रोजी मोर्चा

नाणारसंदर्भात शिवसेनेचा 31 रोजी मोर्चा

Published On: Aug 24 2018 12:44AM | Last Updated: Aug 23 2018 11:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

नाणार प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनाला लवकरच शिवसेना प्रारंभ करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून, दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. संघर्ष यात्रेला सुरुवात करणार असल्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

शिवसेना सर्व पदाधिकारी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून संघर्ष यात्रेला पाटबंधारे येथील सामाजिक न्यास भवनासमोरून सुरुवात होणार आहे. नाणार प्रकल्पांतर्गत येणारे सर्व ग्रामस्थ मारुती मंदिर येथून या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या वतीने महिला वर्ग जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले. यात  सर्व रिफायनरीग्रस्त सहभागी होणार आहेत.

चेंबूर येथे काही दिवसांपूर्वी रिफायनरीमध्ये आग लागली. यावेळी परिसराला मोठा धोका निर्माण झाला होता. या रिफायनरीची व परिसरातील नागरी वस्तीची आपण पाहणी केली. यावेळी प्रत्येक इमारतीमध्ये चार-पाच कॅन्सरग्रस्त, दमा, टीबी अन्य रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले.

कोकणला भस्मसात करणारा रिफायनरी प्रकल्प येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांपासून, केंद्रीय मंत्र्यांपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा मुंबईत होणार आहे. गिरगाव चौपाटी ते ‘वर्षा’ बंगला अशी निमंत्रण यात्रा काढणार आहोत. गणपतीपूर्वी ही निमंत्रण यात्रा  काढून मुख्यमंत्र्यांना रिफायनरीग्रस्त भागात या असे सस्नेह निमंत्रण देणार असल्याचे  खा. राऊत यांनी सांगितले. यावेळी आमदार उदय सामंत, जि.प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते.