Tue, Jul 23, 2019 02:25होमपेज › Konkan › ‘नाणार’बाबत सेनेकडून दिशाभूल

‘नाणार’बाबत सेनेकडून दिशाभूल

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:35PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतील शिवसेनेची पारदर्शकता संपली आहे. नाणार रिफायनरी हे त्याचेच उदाहरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आहेत. त्यांना माहिती असल्याशिवाय हा प्रकल्प पुढे येऊच शकत नाही; मात्र ही सर्व मंडळी अनभिज्ञ असल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण यांनी केला.

मनसे नेते राज ठाकरे यांच्या रत्नागिरी दौर्‍याच्या तयारीसाठी ते रत्नागिरीत आले आहेत. मनसे नेते डॉ. मनोज चव्हाण यांनी भाजपवरही निशाणा साधला. रिफायनरीच्या माध्यमातून सत्ताधारी शिवसेना-भाजप व्यावसायिक झाले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक खासदार, आमदारांना माहिती असल्याशिवाय असा इतका मोठा प्रकल्प प्रस्तावित होऊ शकतो का? आता स्थानिक मंडळी विरोध करू लागल्यानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री गळा काढू लागले आहेत; परंतु सत्ताधारी युती पक्के व्यापारी बनले आहेत. टक्केवारीवर यांनी आपली किंमत केली आहे. चाणक्य नीतीनुसार राजा व्यापारी बनतो तेव्हा जनतेला भिकारीपणाचा अनुभव येतो. तेच येथे घडत असल्याचे ते म्हणाले.

मनसे नेते राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा संपल्यानंतर लगेचच परप्रांतीय हटाव मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे मनसे नेते चव्हाण यांनी सांगितले. तत्पूर्वी ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीय व्यवसाय करत आहेत तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेला आठ दिवसांची मुदत देऊन त्यांना हटविण्यासाठी संधी दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र मनसे स्टाईल सुरू होईल. कोणत्याही शासन दरबारी सर्वसामान्यांची अडवणूक होत असेल त्यांनाही मनसेचे पदाधिकारी सहकार्य करतील, असेही डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेवेळी नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस अजित पाटील, तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर, संपर्कप्रमुख नितीन पाटील, उपशहर अध्यक्ष अरविंद मालाडकर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेची पारदर्शकता आता संपलेली आहे. आता जो काही राहिला आहे तो केवळ व्यापार असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.