Sat, Jul 20, 2019 13:43होमपेज › Konkan › रिफायनरी हटवा, कोकण वाचवा!

रिफायनरी हटवा, कोकण वाचवा!

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:38PMराजापुर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाविरुद्ध जोरदार रान उठवूनदेखील केंद्रासह राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष करत प्रकल्प रेटविण्याचे धोरण अवलंबिल्याने प्रकल्प परिसरात शासनाच्या विरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. कोकणच्या मुळावर आलेला हा विनाशकारी प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी नाणार परिसरातील 9  सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात म्हटल्यानुसार,  निसर्गरम्य कोकण परिसरात असलेल्या नाणारसह 14 गावांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईच्या मनिऑर्डरवर विसंबून असलेल्या कोकणाने आता आपली प्रगती साधली आहे. येथील आंबा, काजू, फणस यासह अन्य फळे, मच्छी अशा उत्पादनावर कोकणात रोजगाराची साधने उपलब्ध झाली आहेत. 

नेपाळ, केरळ आदी भागातून आलेले सुमारे सव्वा लाख लोक रत्नागिरी जिल्ह्यात रोजगारासाठी वास्तव्याला आहेत. या व्यतिरिक्‍त राज्याच्या अन्य भागांतूनदेखील नागरिक आपल्या उपजीविकेसाठी कोकणात येत असतात. कोकणात एवढा रोजगार उपलब्ध असताना असे मोठे प्रकल्प आणण्याची आवश्यकता नाही. 

नियोजित प्रकल्पासाठी प्रशासनाने सुमारे 15 हजार एकर जमीन अधिग्रहण करण्याच्या नोटिसा प्रकल्पग्रस्त  जनतेला  बजावल्या आहेत. नाणार परिसरातील 16 गावांत 25 हजारांहून अधिक कुटुंबे राहत असून मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा आहेत. तर दोन ते तीन हजारांच्या दरम्यान मच्छीमार व्यवसाय करीत आहेत. येथील जनतेचा या प्रकल्पाला प्रखर विरोध असतानादेखील शासन तो न जुमानता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप  या पत्रात करण्यात आला आहे. 

पंतप्रधानांना भेटीचे आमंत्रण

स्थानिक जनता प्रकल्पाविरोधात असतानादेखील शासन तो जुमानत नाही. त्यामुळे पंतप्रधान या नात्याने आपण नाणार परिसराला भेट द्यावी, असे निमंत्रणदेखील नाणार परिसरातील सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.