Thu, Dec 12, 2019 08:56होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधाची वज्रमूठ आवळण्यास प्रारंभ

रिफायनरी विरोधाची वज्रमूठ आवळण्यास प्रारंभ

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 1:09AMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी विरोधातील जनआंदोलन अधिक प्रभावी होण्यासाठी विरोधी संघर्ष समितीने आता प्रकल्पाबाहेरील गावागावांत जाऊन प्रकल्पविरोधात जनजागृतीला सुरुवात केली आहे. एकप्रकारे नाणार रिफायनरी विरोधाची वज्रमूठ आवळण्यास सुरुवात केली आहे.

नुकतीच प्रकल्प क्षेत्राबाहेरील असलेल्या शिवणे व गोवळ गावांत समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी  जाऊन तेथील जनतेची भेट घेऊन हा प्रकल्प कसा पर्यावरणाला घातक आहे 
ते पटवून दिले.

नाणार परिसरातील 14 गावांत हा प्रकल्प मार्गी लागत आहे. येथील पर्यावरणाला हा प्रकल्प घातक असल्याने सर्व जनता त्याविरोधात एकवटली असून गेल्या वर्षभरात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. विधीमंडळासहित संसद भवनाच्या आंदोलनादरम्यान या प्रकल्पविरोधाचे पडसाद उमटले होते. दोन्ही ठिकाणचे सत्ताधारी  भाजप वगळता सर्वच पक्षांनी या प्रकल्पाविरोधात रान उठवले आहे. गेल्या काही महिन्यांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आदींनी  प्रकल्प परिसरात सभा घेऊन येथील जनतेला दिलासा दिला होता.

या प्रकल्प विरोधात नाणार - सागवे परिसरातील जनतेचा कडाडून विरोध असून शंभर टक्के विरोध असतानाच आता कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांचे सहकारी यांनी आपल्या आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवायला सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्पाबाहेरील गावागावांत जाऊन रिफायनरी प्रकल्प कसा घातक आहे ते तेथील जनतेला पटवून  देत  विरोधातील धार आणखी वाढवायची असा निर्धार केला आहे. त्यानुसार 2 दिवसांपूर्वी प्रकल्पाबाहेरील असलेल्या गोवळ व शिवणे या गावांत अशोक वालम व त्यांच्या सहकार्‍यांनी जाऊन दोन्ही गावांतील जनतेची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. आता प्रत्येक गावात जाऊन प्रकल्पविरोधात वातावरण निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे . त्यामुळे रिफायनरीविरोधी लढा अधिक व्यापक होण्याच्या मार्गावर आहे.