Sun, Jan 19, 2020 21:50होमपेज › Konkan › नाणार राहणार, रिफायनरी जाणार

नाणार राहणार, रिफायनरी जाणार

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:27PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार हे नाणार म्हणूनच राहणार; पण हा लादलेला विनाशकारी प्रकल्प मात्र जाणार म्हणजे जाणार.आता अजिबात त्याची चिंता करू नका, कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले, तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागवे येथे पार पडलेल्या नाणार प्रकल्पग्रस्तांच्या सभेत दिला.

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना काढून टीकेचे लक्ष्य ठरलेले राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी सागवे येथे पार पडलेल्या  प्रकल्पग्रस्तांच्या सभेत  ती  अधिसूचना रद्द करीत असल्याची  घोषणा केली. त्याचा आधार घेत ठाकरे यांनी कोकणावर रिफायनरी प्रकल्प लादणार्‍या शासनावर हल्ला चढवला. यावेळी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत, आ. राजन साळवी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी, रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, शिवसैनिक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

नाणार प्रकल्पातीत भूसंपादनाची अधिसूचना रद्द न करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पार पडलेल्या सभेला  मोठ्या प्रमाणावर प्रकल्पग्रस्तांनी हजेरी लावली होती. या सभेत उद्धव ठाकरे  कोणता निर्णय घेतात, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. यापूर्वी 18 मे 2017 ला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना काढली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. मात्र, जनसामान्यांचा प्रकल्पाला असलेला  विरोध लक्षात घेऊन ती अधिसूचना  आपण  रद्द  करीत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सागवेच्या  सभेत  केली. सुभाष देसाईंच्या त्या घोषणेचा आधार घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शासनावर टीका केली. कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र, कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले असून शिवसेना त्याला विरोध करील, अशा शब्दांत त्यांनी ठणकावून सांगितले.

रिफायनरीचा प्रकल्प नाणारमधून रद्द झाल्यास तो गुजरातला जाईल, असे मुखमंत्री सांगत आहेत तर त्यांच्या पक्षाचे एक नेते तो प्रकल्प नागपुरात आणा, अशी मागणी करीत आहेत. त्याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. गुजरात काय किंवा नागपूर काय त्यांना हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. आमच्या निसर्गाला धोका करणारे प्रकल्प आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरी बांधव, बागायतदार, मच्छीमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे. येथील निसर्गाचे वैभव हे टिकलेच पाहिजे, त्यामुळे शिवसेना  कोकणचा गुजरात होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नव्हती मग आता ही मंडळी कोठून  आली परप्रांतांतील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली?असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला  दिले होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदीशी सामंजस्य करार केला. त्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या  शब्दाला  दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना सदैव तुमच्या समवेत राहिली आहे व यापुढेदेखील राहिल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांनीच रिफायनरीवरुन भाजपवर यथेच्छ तोंडसुख घेतले.