होमपेज › Konkan › राजापूर तहसीलवर ‘नाणार’विरोधी मोर्चा

राजापूर तहसीलवर ‘नाणार’विरोधी मोर्चा

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 31 2018 12:02AMराजापूर : प्रतिनिधी

नाणार रिफायनरीला शंभर टक्के विरोध असतानादेखील प्रकल्प लादू पाहणार्‍या केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात  राजापूर तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. कोकणच्या मुळावर आलेला हा विनाशकारी प्रकल्प व औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केलेली अधिसूचना शासनाने तत्काळ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मोर्चा संपताच ‘भूमीकन्या एकता मंच’तर्फे प्रांताधिकारी अभय करगुटकर यांना देण्यात आले.

गेल्या वर्षभराहून अधिक काळ नाणार प्रकल्पावरून जोरदार घमासान सुरू आहे. या दरम्यान विविध आंदोलने झाली. प्रकल्प क्षेत्रातील 14 गावांतील जनतेने आपला शंभर टक्के विरोध वारंवार दर्शवून दिला. पण शासनाने त्याला न जुमानता हा प्रकल्प रेटून नेण्याची नीती अवलंबल्याने संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी शहरातील राजीव गांधी मैदानावर समस्त प्रकल्पग्रस्त गोळा होऊ लागले. 

प्रकल्प परिसरातील 14 गावांसह आजूबाजूच्या गावांतील तसेच तालुक्याच्या विविध भागांतून नागरिकदेखील शासनाला विरोध करण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते. मागील मोर्चा हा पक्षविरहीत होता.  मात्र, या मोर्चामध्ये काही पक्षांची मंडळी सहभागी झाली होती. त्यामध्ये काँग्रेसकडून आ. हुस्नबानू खलिफे, हरिष रोग्ये, अविनाश लाड, ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष  चव्हाण यांसह सेनेचे माजी सभापती कमलाकर कदम,  ‘संघर्ष समिती’चे अशोक वालम, नंदू कुलकर्णी, ओंकार देसाई, मज्जीद भाटकर व अन्य यांचा समावेश होता. सकाळी 11 वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. त्यावेळी हजारो मोर्चेकरी प्रकल्पग्रस्त  सहभागी झाले होते.
‘भूमीकन्या एकता मंच’च्या वतीने तहसील कार्यालयात उपस्थित राहिलेले प्रांताधिकारी अभय करगुटकर व तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांना स्वतंत्र निवेदने  देण्यात आली. जर शासनाने आमच्या भावनांचा विचार न केल्यास आमचे आंदोलन यापुढेदेखील सुरुच राहिल, असा इशारा देण्यात आला. त्यावेळी दीप्ती घाडी, सुनीता राणे, किमया वालम, नेहा दुसणकर आदींनी हे निवेदन सादर केले.तहसीलच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

केंद्र, राज्य शासनाविरोधात घोषणा
जोरदार विरोध असतानादेखील प्रकल्प लादणार्‍या केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात टीकात्मक घोषणा दिल्या जात होत्या. प्रत्येकाच्या हातात निषेधाचे फलक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. बुलंद घोषणांनी राजापूरचा परिसर दणाणून गेला. राजीव गांधी मैदानापासून पायी प्रवास करीत मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला.