Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधाची रणनीती?

‘नाणार’विरोधाची रणनीती?

Published On: Apr 16 2018 12:25AM | Last Updated: Apr 15 2018 11:01PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाला विरोध करणार्‍या प्रकल्पग्रस्तांना शिवसेनेचादेखील पाठिंबा असून दि. 23 एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाणार परिसराचा दौरा करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिक जनतेला पाठिंबा लाभणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने आ. राजन साळवी व त्यांच्या सहकार्‍यांनी रविवारी नियोजित सभेच्या जागेची पाहणी केली. या सभेत रिफायनरी विरोधाची रणनीती ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नाणार प्रकल्पातील शिवसेनेच्या भूमिकेवरून सेनेवर टीका होत असतानाच सेनेनेदेखील वारंवार होत असलेल्या टीकेला रोखठोक उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने  अरामको  या सौदी कंपनीशी सामंजस्य करार केला होता. त्याचे तालुक्यात जोरदार पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टीकेचे लक्ष्य केले होते. 

हा प्रकल्प केंद्राचा असला तरी त्यासाठी लागणारी जागा ही महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक महामंडळाकडून अधिग्रहण केली जाणार असल्याने त्यासाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जो अध्यादेश काढण्यात आला होता, तो सेनेचे उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांच्या सहीनिशी होता. त्यामुळे सेनेवर प्रकल्प आणल्याची टीका कायम आहे.  प्रकल्प विरोधी समितीनेदेखील त्यावर बोट ठेवीत, तो अध्यादेश मागे का घेत नाही, अशी सातत्याने विचारणा सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्या अध्यादेशावर काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.शिवसेना पक्षप्रमुखांच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे शिष्टमंडळ नाणारचा दौरा करणार आहेत.