Fri, Jan 18, 2019 07:26होमपेज › Konkan › नाणार प्रकल्पासंदर्भातील नोटिशीची ‘मनसे’कडून होळी

नाणार प्रकल्पासंदर्भातील नोटिशीची ‘मनसे’कडून होळी

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणारवासीयांच्या माथी शासनाने बळजबरीने रिफायनरी प्रकल्प लादला असून आता प्रकल्पग्रस्तांना जमीन मोबदल्यासाठी आमिषे दाखविली जात आहेत. येथील शासकीय अधिकारीच प्रकल्पातील दलालांचे नेतृत्व करीत असल्याचा जोरदार आरोप करीत ‘मनसे’ने राजापूरच्या जवाहर चौकात उपविभागीय कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या नोटिशीची जाहीर होळी करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून समस्त प्रकल्पग्रस्तांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. शासनाकडून किती प्रमाणात प्रती हेक्टरी मोबदला आवश्यक आहे त्याचे संमत्तीपत्र द्यावे, असे आवाहन त्या नोटिसांमध्ये करण्यात आले होते. त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला. अशा नोटिसा बजावून शासनाने प्रकल्पग्रस्तांवर प्रकल्प लादण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र, ‘मनसे’ तो प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा देत ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी जवाहर चौकात त्या नोटिसांच्या प्रतींची होळी केली.
यावेळी ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यासह राजू पवार, सुनील जठार, अजिम जैतापकर, जयेंद्र कोठारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.