Sat, Jul 20, 2019 11:30होमपेज › Konkan › ‘नाणार’ रद्द करण्यासाठी ‘मनसे’ जनतेसोबत

‘नाणार’ रद्द करण्यासाठी ‘मनसे’ जनतेसोबत

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:43PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

कोकणात या पूर्वी आलेल्या विविध प्रकल्पांना विरोध म्हणून झालेली आंदोलने कशी बारगळली तो इतिहास सर्वश्रुत असून कोकणी माणूस  ‘मॅनेज’ होतो, असा शासनाचा समज आहे.  हा  समज  हाणून पाडायचा असेल तर तुम्हाला एकजुटीने रहावे लागेल. यामध्ये मी व माझा पक्ष जनतेसमवेत असून शासनाला असा दणका देऊ की, यापुढे कोकणात असे विनाशकारी प्रकल्प आणण्याचे धाडस शासन करणार नाही, अशा शब्दांत ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी  शनिवारी रोखठोक भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांना भेटून जनतेचा जोरदार विरोध असल्याने प्रकल्प रद्द केला जावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने राजापूर तालुक्यातील सागवे-नाणार परिसरातील 14 गावांवर रिफायनरी प्रकल्प लादला असून त्या विरोधात जोरदार आंदोलने सुरु आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनविारी प्रकल्प परिसराचा दौरा करुन प्रकल्पाला विरोध नक्‍की कशासाठी आहे, हे  समजून घेतले. कात्रादेवी येथील मैदानावर पार पडलेल्या सभेला ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अभिजीत पानसे, राजा चौघुले आदी नेते मंडळी उपस्थित होती.

सुरुवातीला प्रकल्पविरोधकांतर्फे नंदकुमार कुलकर्णी, मच्छीमार नेते मज्जीद भाटकर, स्वाती कुलकर्णी व तन्वी मोंडे आदींनी विचार व्यक्‍त करताना शासनाने रिफायनरी प्रकल्प रेटून नेताना कशी दडपशाही चालविली आहे, यावर घणाघात केला. आपले सर्व पर्याय संपले असून, यात आपण  लक्ष घालून हा प्रकल्प रद्द करावा, अशी विनंती राज ठाकरेंकडे वक्त्यांनी केली. या प्रकरणी जनतेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर   ‘मनसे’   अध्यक्षांनी आपण हाती घेतलेले काम तडीला लावल्याशिवाय राहात नाही, असे स्पष्ट केले. कोकणातील या पूर्वीच्या आंदोलनांचा अनुभव लक्षात घेता रिफायनरीबाबत तसे काही घडू नये, यासाठी तुमची एकजूट कायम ठेवा , असे आवाहन त्यांनी केले.

तुमच्यातील एकजूट कायम राहिली नाही तर साक्षात ब्रह्मदेवही तुम्हाला वाचवायला येणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. यापूर्वी भूगोलावरुन इतिहास घडलेला आहे, असे सांगताना त्यांनी जगाच्या पाठीवर झालेली युद्धे किंवा महायुद्धे ही जमिनींवरुन झाली आहेत. याची आठवण करुन दिली. त्यामुळे आपल्या बहुमूल्य जमिनी विकू नका. नाहीतर एक दिवस ही मंडळी अल्प किमतीला तुमच्या जमिनी खरेदी करतील व त्या चढ्या भावाने विकून श्रीमंत होतील. तुम्हाला या कोकणातून बाहेर जावे लागेल. तसे उद्योग सुरु असल्याचा धोका त्यांनी व्यक्‍त केला.
केरळ, गोवा राज्यातही चांगला निसर्ग आहे. पण, त्या राज्यांमध्ये पर्यावरणाला व पर्यटनाला पूरक ठरतील असेच प्रकल्प आणले जातात. त्यांच्याकडे असे विनाशकारी प्रकल्प आलेले नाहीत. मग केवळ आमच्या कोकणच्या माथीच असे प्रकल्प कशासाठी लादले जातात, असा सवाल त्यांनी केला. आम्ही विकासाला कधीच विरोध केलेला नाही. मात्र, जनतेचा विरोध असताना शासन प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध असून  यामध्ये शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहू व हा प्रकल्प रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.शासन यापुढे कोकणात असे प्रकल्प आणताना विचार करेल, या शब्दांत मनसे अध्यक्षांनी समाचार घेतला. आता मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन येथील जनतेची विरोधी भावना त्यांना पटवून देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे राज ठाकरे यांनी  सांगताच टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत केले.
राज ठाकरे यांच्या या सभेला सुमारे दोन हजार प्रकल्प विरोधक उपस्थित होते .