मुंबई : विशेष प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला विरोध पाहता हा प्रकल्प घालविणार की राहणार याबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांनी मागणी केल्याप्रमाणे सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली.
उद्योग, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, सामाजिक न्याय, नियोजन विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी नाणार रिफायनरीचा प्रश्न उपस्थित केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली असून, या मागणीवर आता मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी आणि प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भास्कर जाधव यांनी नाणार प्रकल्पाबाबत सभागृहात विषय उपस्थित केल्यानंतर अर्धा तास चर्चा घेण्याचे मान्य करण्यात आले असले तरी अजूनही ही चर्चा घेतली नाही. शिवसेनेचा रोष पत्करावा लागेल म्हणून सरकार घाबरलेले आहे. म्हणून सरकार चर्चा टाळत आहे. मात्र, जर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चर्चा केली नाहीतर प्रकल्पाच्या संदर्भात स्थानिकांच्या मनात असलेली भीती खरी करण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत हे स्पष्ट होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
Tags : nanar, green refinery, project, jayant patil ,ncp, shivsena, konkan news