Wed, Apr 24, 2019 00:05होमपेज › Konkan › ‘नाणार’बाबत शिवसेना दुटप्पी : नीलेश राणे

‘नाणार’बाबत शिवसेना दुटप्पी : नीलेश राणे

Published On: Mar 20 2018 10:50PM | Last Updated: Mar 20 2018 10:50PMलांजा : प्रतिनिधी

आपल्याला येथील जनतेचा कळवळा आहे, असे एकीकडे दाखवायचे तर दुसरीकडे त्यांच्याच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी नाणार प्रकल्पातील जमिनींची दलाली करायची, अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.

लांजा तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाच्या वतीने माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते  त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महंमद रखांगी, मुनाफ दसूरकर,  दीपक बेंद्रे, सचिन माजळकर, संकेत चवंडे, संघाचे अध्यक्ष महेश खामकर, शामराव पानवलकर, संजय यादव आदी प्रमुख उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना नीलेश राणे म्हणाले की, निसर्गरम्य कोकणात काळा धूर नको, अशी आपली सुरुवातीपासूनच ठाम भूमिका आहे.  परंतु,   ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, पालकमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या शिवसेनेचेच पदाधिकारी  नाणार प्रकल्पात गुंतलेले आहेत. येथील खासदार ग्रामस्थांसाठी कधीही भांडताना दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात ‘खविसं’च्या  कार्याबाबत बोलताना ते म्हणाले की, लांजा तालुका खरेदी -विक्री संघाने आपल्या स्थापनेपासून आजतागायत गेल्या 56 वर्षांच्या कालावधीत संघ सतत फायद्यात ठेवला आहे, हे सर्व श्रेय प्रामाणिक पदाधिकारी व संचालकांचे असून हे त्यांचे काम प्रशंसनीय असल्याचे उद‍्गार त्यांनी काढले  यावेळी नीलेश राणे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खरेदी विक्री संघाकडून शेतकर्‍यांना काजू रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला लांजातील ग्रामस्थ, पदाधिकारी, खरेदी-विक्रीचे संचालक उपस्थित होते.