होमपेज › Konkan › ‘समृद्धी’प्रमाणे ‘नाणार’वर तोडगा

‘समृद्धी’प्रमाणे ‘नाणार’वर तोडगा

Published On: Jul 13 2018 10:48PM | Last Updated: Jul 13 2018 10:48PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाला सध्या जसा विरोध होत आहे, तसाच विरोध समृद्धी महामार्गावेळीदेखील झाला होता. ग्रामपंचायतींनी प्रकल्पाविरोधात ठराव दिले होते आणि त्यावेळीही रक्ताचे पाट वाहतील, असे इशारे देण्यात आले. मात्र, ‘समृद्धी’साठी चर्चेतून मार्ग काढण्यात आल्यानंतर 93 टक्के जमीन संपादित झाली. याच पद्धतीने ‘नाणार’मध्येही चर्चेतून तोडगा काढला जाईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत  व्यक्त केला. 
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी असलेला शिवसेनेचा विरोध आता संपला असून, शिवसेनेनेही या प्रकल्पाला मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. नाणार प्रकल्पाबाबत शंका दूर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नाणार प्रकल्प आपण कुणावरही लादणार नाही. सर्व शंका दूर केल्या जातील. शंका दूर केल्याशिवाय सरकार प्रकल्प रेटणार नाही. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा देशाच्या हिताचा आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच एका प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. हा गुजरातला जाणारा प्रकल्प आपण राज्यात आणला. त्यातून पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगत त्यांनी प्रकल्पाचे समर्थन केले.

सभागृहात सलग तिसर्‍या दिवशीही नाणारचा मुद्दा गाजला. विरोधी पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ करीत कामकाज बंद पाडले. या विषयावर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी नाणारवर निवेदन करताना प्रकल्प रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. तर प्रकल्पाबाबत स्थानिकांसह सर्वांशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढला जाईल, असे स्पष्ट केले. प्रकल्पाबाबत निरी, आयआयटीसारख्या संस्थांमार्फत सामाजिक आणि पर्यावरणीय अभ्यास केला जाईल, असेही ते म्हणाले.

गुजरातमध्ये जामनगर रिफायनरीमुळे पर्यावरणाचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. उलट जामनगर रिफायनरीने गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम झाला. जामनगरच्या आंब्याची निर्यात वाढली. रिफायनरीमुळे फळबागांना धोका निर्माण झाल्याचे दिसून आलेले नाही. नाणार ही ग्रीन रिफायनरी आहे. कोकणातील आंबा, काजूच्या बागा नष्ट होऊन शेतकरी, मच्छीमार उद्ध्वस्त होतील, ही भीती पसरविली जात असली तरी त्यात काहीही तथ्य नाही. जागतिक नियमानुसार प्रकल्पात एक तृतीयांश वनजमीन तयार केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

नाणारमधील प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक होऊन समितीच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. समितीने प्रकल्प मान्य केल्याचे इतिवृत्तही आहे. मात्र, काही एनजीओनी प्रकल्पाविरोधात विखारी प्रचार सुरू केला, असेही त्यांनी सांगितले.

नाणार रद्दच करा : सुनील प्रभू

मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने शिवसेना आमदारांचे समाधान झाले नाही. प्रकल्पाची अधिसूचना रद्द करून, प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, अशी मागणी शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. काँग्रेस राष्ट्रवादीनेही हीच मागणी करीत गदारोळ केल्याने कामकाज प्रथम दोनवेळा तहकूब झाले. त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.