होमपेज › Konkan › ‘नाणार’वरून पुन्हा गदारोळ

‘नाणार’वरून पुन्हा गदारोळ

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 9:50PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे प्रेम बेगडी असून, बुधवारी नागपुरात आंदोलनासाठी आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना आमदारांना हाकलून लावल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. त्यावर चवताळलेल्या शिवसेनेने विखे-पाटील खोटे बोलत असून, उलट कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेनेमुळेच प्रकल्प रद्द होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. त्यामुळे विखे-पाटील यांनी खोट्या आरोपाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाणार प्रकल्पावर चर्चेची मागणी करीत स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली. अध्यक्षांनी स्थगन नाकारला. मात्र, विखे-पाटील यांनी यावेळी बोलताना शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टोलेबाजी केली. प्रकल्पाबाबत दुटप्पी राजकारण करणारे या सभागृहात बसले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना खासदारही आत एक आणि बाहेर एक भूमिका घेत आहेत. शिवसेनेने निवडणुका आल्यामुळे या प्रकल्पाला विरोध सुरू केल्याचे प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना आमदारांना सुनावल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

त्यावर सुनील प्रभू म्हणाले, विरोधी पक्षनेते विखे-पाटील हे खोटे बोलत आहेत. उलट कृती समितीच्या अध्यक्षांनी शिवसेना आमदार भेटीसाठी शिवसेनेमुळेच जाणार असल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट नाकारल्याबद्दलही प्रकल्पग्रस्तांनी धन्यवाद दिल्याचे प्रभू म्हणाले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विखे-पाटील यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबरच शिवसेना सदस्यही नाणारविरोधात घोषणाबाजी करीत हौदात उतरल्याने कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. अखेर हा गदारोळ थांबत नसल्याने तालिका अध्यक्षांनी कामकाज पत्रिकेवरील कामकाज व विधेयके मंजूर करीत सभागृह दिवसभरासाठी स्थगित केले.