Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Konkan › ‘नाणार’वरून प्रचंड गोंधळ

‘नाणार’वरून प्रचंड गोंधळ

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 10:00PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाच्या विरोधात आपणच आहोत, याचे श्रेय घेण्यासाठी बुधवारी शिवसेना आणि नितेश राणे यांच्यात विधानसभेतील राजदंड पळवण्यासाठी अक्षरशः झटपट झाली आणि या झटापटीत अध्यक्षांचा चोपदार जखमी झाला. विरोधी पक्षासह शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्याने कामकाज चालवणे अशक्य झाले आणि या गदारोळातच दिवसभराचे कामकाज पुकारून सभागृह तहकूब झाले.

विरोधकांच्या 293 वरील प्रस्तावावर सरकारकडून उत्तर झाल्यानंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाणार प्रकल्पासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी अध्यक्षांकडे मागितली. या प्रकल्पाच्या विरोधात आलेल्या मोर्चाला सामोरे जाण्याचे कारण देत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रस्तावावर लवकर चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. त्याचवेळी या प्रकल्पाविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाणारवासीयांनी विधान भवनाबाहेर धरणे धरले असून, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे बोलण्याची परवानगी मागितली. मात्र, विधानसभाध्यक्षांनी परवानगी नाकारताच शिवसेनेच्या आमदारांनी कापडी फलक हातात घेऊन घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी सुरू होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

गोंधळ त्यानंतरदेखील सुरू राहील, असे गृहीत धरून लागोपाठ चार वेळा सभागृह तहकूब करण्यात आले. अखेर पाचव्यांदा सभागृह सुरू झाले, तेव्हा अध्यक्ष बागडे यांनी गोंधळातच कामकाज पुकारण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अध्यक्षांच्या आसनावर चढून राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत घोषणा देणार्‍या शिवसेना आमदारांनी ते पाहताच आसनाकडे धाव घेतली व राजदंड राणे यांच्या हातातून हिसकावून स्वतः पळवण्याचा प्रयत्न केला. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि नितेश राणे यांच्यात राजदंडाचा ताबा घेण्यासाठी झटापट सुरू असतानाच त्यांना रोखण्यासाठी चोपदार आणि रक्षक पुढे आले. एकमेकांच्या अंगावर पडेपर्यंत आमदार आणि चोपदारांमध्ये झटापट झाली.

हा गदारोळ सुरू असतानाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनियोजन विधेयक सभागृहात मांडत ते गोंधळातच मंजूर करून घेतले. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सहकार्य केले. पुढील कामकाज पुकारले आणि गदारोळातच  कामकाज संपवून दिवसभरासाठी सभागृह तहकूब झाले.