Tue, Nov 19, 2019 10:36होमपेज › Konkan › चिपी विमानतळावरून जूनमध्ये ‘टेक ऑफ’

चिपी विमानतळावरून जूनमध्ये ‘टेक ऑफ’

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 1:42AM

बुकमार्क करा

नागपूर : अजित सावंत

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून जून 2018 मध्ये पहिले विमान ‘टेक ऑफ’ घेणार आहे. येत्या मार्चमध्येच विमान लँड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या विमानतळाची धावपट्टी व इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळाकडे जाणारा बायपास रस्ता सुमारे 5 कोटी खर्च करून सा. बां. विभागामार्फत केला जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नागपूर येथे सिंधुदुर्गातील पत्रकारांशी बोलताना दिली.

विधिमंडळातील आपल्या दालनात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ना. केसरकर म्हणाले, या विमानतळाच्या कामाला गती देण्यासाठी आपण स्वतः तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि एमआयडीसी, आयआरबी, एल अँड टी यांची संयुक्त बैठक झाली.  काही अटी शर्थीमळे सा.बां.विभागाने पर्यायी रस्ता करण्यास नकार दिला होता. मात्र, चर्चेअंती सा. बां. विभागाने हा रस्ता करण्यास संमती दर्शवली आहे. लवकरात लवकर या रस्त्यासहित अन्यही जोडरस्ते पूर्ण केले जाणार आहेत. केंद्र शासनाने सागरी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा फायदा या विमानतळाला होणार आहे.

ना. केसरकर म्हणाले, गोवा विमानतळाची सध्याची क्षमता पाहता गोवा येथील पर्यटकांना याचा लाभ होणार आहे. या विमानतळाला केंद्राची अंतिम मंजुरी मिळावी याकरिता लवकरच आपण आणि 
उद्योगमंत्री सुभाष देसाई दिल्लीला जाणार आहोत. मार्चमध्येच शक्यतो विमान लँडिंगचे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

या विमानतळाजवळून गोव्याकडे जाणार्‍या व मागील विजयदुर्गकडे जाणार्‍या रस्त्यांचे नूतनीकरण झाले आहे. आता तशा कोणत्याही अडचणी नाहीत,असेही ते म्हणाले.आडाळी एमआयडीसीचे कामही सुरू करण्याबाबत लवकरच उद्योग्यमंत्री व संबंधित अधिकार्‍यांची बैठक होणार असल्याचे ना. केसरकर म्हणाले