Thu, Jan 24, 2019 04:14होमपेज › Konkan › पावसामुळे कासार्डेत महामार्ग जलमय

पावसामुळे कासार्डेत महामार्ग जलमय

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 8:43PMनांदगाव : वार्ताहर

बुधवारी जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली. चौपदरीकरण प्रगतीपथावर असलेला महामार्ग  कासार्डे-जांभूळवाडी येथे सुमारे दोन तास ठप्प झाला होता. मात्र, ठेकेदार कंपनीचे कामगार वगळता पोलिस, महामार्ग पोलिस, आपत्ती व्यवस्थापन असे कोणीही उपस्थित नव्हते. स्थानिक  ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली. 

 बुधवारी सायंकाळपासून कासार्डे-जांभूळवाडी परिसरात मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे कासार्डे पोलिस दूरक्षेत्र,कासार्डे तिठ्ठा परिसरात मोठया प्रमाणात पाणी साचले. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कासार्डे-जांभूळवाडी येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन न केल्याने  परिसरात महामार्ग जलमय झाला तर आसपासच्या घरांच्या परिसरातही पाणी भरले.  जुन्या महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक  नूतन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून वळविण्यात आली. मात्र, रस्त्याच्या साईडपट्टीवर ट्रक रूतल्याने महामार्गावरील  वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली. परिणामी  दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग ठेकेदार कंपनीने आपले कामगार पाठवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. वाहनचालक व नागरिकांमधून ठेकेदा कंपनीच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत होता. हाकेच्या अंतरावर असलेले  कासार्डे पोलिस दूरक्षेत्र, महामार्ग वाहतूक पोलिस,आपत्ती व्यवस्थापन कक्ष यातील कोणीही घटनास्थळी दाखल झाले नाहीत.

 स्थानिक ग्रामस्थ सहदेव उर्फ आण्णा खाडये, नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, पप्या केसरकर, रूपेश कानसे, रमाकांत लाड, सत्यवान लाड आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेत तब्बल दोन तास ठप्प झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.