Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Konkan › ‘सावडाव धबधबा’ वर्षा पर्यटकांनी फुलतोय!

‘सावडाव धबधबा’ वर्षा पर्यटकांनी फुलतोय!

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 9:49PMनांदगाव : वार्ताहर

दमदार पडणार्‍या पावसाचा आनंद घेण्यासाठी सध्या वर्षा पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित धबधबा म्हणून ओळख असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्याला पसंती देत आहेत. वर्षा सहलींसाठी पर्यटकांना आकर्षित करत असलेला सावडाव धबधबा पूर्णपणे प्रवाहीत झाला आहे. एरव्ही सुट्टीच्या दिवशी गजबजलेल्या सावडाव धबधब्यावर रविवार सोडून इतर दिवशीही पर्यटक गर्दी करून मनसोक्त आनंद लुटत आहेत.

सावडाव धबधब्याची निर्मिती होण्यासाठी 1975 सालापासून सावडाव गावचे सुपुत्र माजी केंद्रप्रमुख रघुनाथ कामतेकर  व ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न करून सुरुवात केली. सावडावच्या खांदारवाडी सीमेवर असलेल्या दिर्बादेवी मंदिराच्या दिर्बा ओहळावर उगम असलेला हा धबधबा पाझर धबधबा आहे.पूर्वी हा धबधभा ‘राजाराणी धबधबा’ म्हणून ओळखला जायचा. कारण एका बाजूला स्त्रिया व एका बाजूला पुरूषांना आंघोळ करण्याची व्यवस्था त्यावेळी करण्यात आली होती. म्हणून या धबधब्याला राजाराणी धबधबा म्हणून नाव पडले होते. धबधब्याच्या प्रवाहात मधोमध असणारे शंभर वर्षापूर्वीचे अष्टकाचे झाड सर्वांच्याच नजरा वेधून घेत आहे.  कालांतराने धबधब्याकडे जाण्याचा मार्ग तितकासा चांगला नव्हता.गेल्या पंधरा वर्षांत प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आलेल्या सावडाव धबधब्याचा 2010 साली पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत ‘क’  वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आला.तेवहापासून सावडाव धबधब्याकडे विशेष लक्ष देवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या.सावडाव ग्रा.पं.व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त सुविधा पर्यटकांना आकर्षित करतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या लोखंडी रॅम्प, बाथरूम अशा सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत सावडाव धबधब्याला परिसरात जाण्यासाठी 10 लाखाचा स्ट्रीटलाईटसाठी निधी मंजूर झालेला असून सदर काम आजही प्रगतीपथावर आहे. सावडाव धबधब्याकडे जाणारा स्वागत कमानी ते धबधबा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला असून काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. यामुळे सध्या सावडाव धबधब्याकडे जाताना खड्डेमय रस्यातूनच प्रवास करावा लागतो. ग्रा.पं.स्तरावरुन सावडाव परिसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता अशा प्रकारची कामे सुरू आहेत.पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने सावडावकडे विशेष लक्ष दिल्यास पर्यटकांची लक्षणीय वाढ होईल.यासाठी स्थानिक सत्ताधारी व विरोधक यांनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे.