Thu, Apr 25, 2019 21:31होमपेज › Konkan › कणकवली न. पं. आज निकाल

कणकवली न. पं. आज निकाल

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 10:38PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 12) सकाळी 10 वाजल्यापासून  कणकवली तहसील कार्यालयात होणार आहे. त्यासाठी सहा टेबल लावण्यात येणार आहेत.प्रत्येक फेरीत सहा प्रभाग अशा तीन फेरींत ही मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. या मतमोजणीत कणकवली नगरपंचायतीवर सत्ता कोणाची याचा फैसला दुपारी 12.30 वाजेपर्यंत होणार आहे. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सौ. नीता सावंत-शिंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने आणि अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. कणकवली न. पं. च्या नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार आणि 17 नगरसेवकपदांसाठी 58 अशा एकूण 62 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक शिपाई असे कर्मचारी असणार आहेत. तसेच सहाही टेबलवर उमेदवारांचे प्रतिनिधी असणार आहेत. प्रभाग 1 ते 17 यानुसार मतमोजणी होणार असून प्रत्येक प्रभागात नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेली मते आणि त्या प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी मोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीनंतर सहा प्रभागांतील उमेदवारांचे निकाल स्पष्ट होणार आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या निकालासाठी प्रभाग 17 पर्यंत  वाट पाहावी लागणार आहे. 

Tags : Konkan, municipality, election, result, Kankavli