Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Konkan › एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी तत्काळ बंद करा

एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी तत्काळ बंद करा

Published On: Apr 13 2018 10:44PM | Last Updated: Apr 13 2018 10:44PMमुंबई : प्रतिनिधी

समुद्रामध्ये एलईडी लाईटद्वारे करण्यात येणार्‍या मासेमारीमुळे मत्स्यसाठ्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. हे लक्षात घेता अशा प्रकारची मासेमारी तत्काळ पूर्णत: बंद करण्यात यावी. तसेच अवैध मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिले आहेत. 

एलईडीच्या प्रकाशामुळे सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एकाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. 

त्यामुळे एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात सचिव कुरुंदकर यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधले, वन विभागाच्या मँग्रुव सेलचे मुख्य वनसंरक्षक वासुदेवन, सहआयुक्त राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

ट्रॉलनेटद्वारे मासेमारी करणार्‍या सर्व जाळयांचा खोला (कॉडएंड) 40 मी. मी. करण्यात यावा. त्यामुळे मासळीच्या छोट्या पिल्लांचे संरक्षण होऊन मासळीचे उत्पन्न वाढण्यात मदत होते. जाळे खरेदी करण्याकरिता ई-टेंडर प्रक्रिया राबवून तात्काळ 40 मी.मी. कॉडएंडच्या जाळ्या बदलून द्याव्यात. 12 नॉटीकल माईलच्या पुढे पर्ससीन व ट्रॉलिंग मासेमारी करणार्‍या सर्व नौकांना व्हेसल ट्रॅफिक सर्व्हीसेस-व्हीटीएस(एआयएस) लावण्यासाठी मँग्रुव्ह फौंडेशनच्या सहकार्याने योजना तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

कासव,  डॉल्फीन आदी दुर्मिळ प्रजाती मासेमारांच्या जाळ्यात आल्यास त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी मच्छीमारांना जाळी कापावी लागते. त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होते. अशा मच्छीमारांच्या नुकसान भरपाईसाठीची योजना मँग्रुव्ह सेलसमवेत चर्चा करुन शासनास सादर करावी. काही मच्छीमार दुर्मिळ प्रजाती पकडत असल्यास त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. याकरीता संयुक्तरित्या गस्त घालण्यात यावी. यासंदर्भात मच्छीमारांमध्ये व आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व जनजागृती करण्यात यावी, असे कुरुंदकर यांनी सांगितले.