Mon, Jun 24, 2019 17:44होमपेज › Konkan › तक्रारींसाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदत

तक्रारींसाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदत

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:56PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग भूसंपादन प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पूर्ण करण्यात येत आहे.  नुकसानभरपाई जमिनीचा मोबादला जास्तीत जास्त मिळावा व प्रकल्पबाधितांचे कोणतेही नुकसान होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तरीही कणकवली शहरातील प्रकल्पबाधितांची सार्वत्रिक तक्रार आहे.  कणकवली शहरात 477 खातेदार बाधित झाले आहेत; मात्र यापैकी आपल्या ध्यक्षतेखालील लवादाकडे केवळ 16 च खातेदारांच्या तक्रारी  दाखल झाल्या आहेत. तरीही ज्या खातेदारांवर अन्याय झाला आहे, अशा खातेदारांनी मंगळवार, 12 डिसेंबर दुपारी 2 वा. पर्यंत तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले. जिल्हाधिकारी दालनात खास पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कणकवली प्रांताधिकारी नीता शिंदे, वकील श्री. सामंत, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते.  जमिनीचा दर तसेच त्यातील मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत. तरीही काही अन्याय झाला असेल तर कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने लवादाकडे तक्रारी दाखल कराव्यात. लवादाच्या निर्णयानंतर समाधान झाले नाही तर न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला  आहे. मात्र, पहिल्यांदा लवादाकडे तक्रार असणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.  

कणकवलीमधील भूसंपादन संदर्भात तेथील बाधितांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात बर्‍याच वेळा शिष्टमंडळाशी बोलणी झाली. या प्रत्येकवेळी आपण आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या लवादासमोर मांडा असे सूचित केले आहे. महामार्ग प्रशासन तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हेच सुचविले. मात्र अद्यापपर्यंत कणकवली शहरातील एकूण 477 बाधितांपैकी केवळ 16 जणांनीच अर्ज केले आहेत आणि असे अर्ज आपल्याला दिलेल्या लवादाकडे करण्यासाठी केवळ मंगळवार दुपारी 2 वाजेपर्यंतच वेळ आहे. त्यामुळे या आधी अर्ज करावेत म्हणजे या अर्जांवर योग्य निर्णय घेता येईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर कणकवलीवासीयांनी अर्ज करावेत असे आवाहन श्री. चौधरी यानी यावेळी केले.