Mon, May 20, 2019 08:27होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; तीन तासानंतर वाहतूक सुरळीत

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; तीन तासानंतर वाहतूक सुरळीत

Published On: Jul 05 2018 8:11AM | Last Updated: Jul 05 2018 8:11AMमहाड : श्रीकृष्ण द.बाळ. 

या मोसमातील गेल्या चोवीस तासात १०२ मिलिमीटर  पावसाची नोंद करीत महाड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाच्या जवळ सुरू चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचठिकाणी पहाटे ५.३० च्या सुमारास दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक साडे तीन तास पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या लार्सेन ॲण्‍ड टुब्रो कंपनीच्या आपत्ती यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र यावेळी दिसून आले. 

दरड कोसळल्यानंतर सुमारे दोन तासांच्या विलंबाने या कंपनीची आपत्ती यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळी पोचल्याबद्दल महाडचे प्रांताधिकारी इनामदार यांनी आपत्ती यंत्रणेतील सर्व संबंधित विभागांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. तसेच यापुढे अशा प्रकारची दिरंगाई झाल्यास त्यांच्याविरोधात २००५ च्या नैसर्गिक आपत्ती कायद्यानुसार सक्त कारवाई करण्याचे संकेत दिले असून यासंदर्भात संबंधित यंत्रणांना आपण लेखी पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे .

मागील  चोवीस तासात महाड पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. केंबुर्ली गावच्या हद्दीत राष्‍ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असलेलया ठिकाणी दरडसह माती व झाडे उन्मळून रस्‍त्यावर आली. त्यामुळे रस्त्यावर सुमारे पन्नास मीटर परिसरात मातीचा भराव  झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प होती.

या मार्गावरून जाणाऱ्या एसटीतील काही प्रवाशांनी याबाबतची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर येथून लार्सन ॲण्‍ड टुब्रो कंपनीला यासंदर्भातील यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महाडचे प्रांताधिकारी यांनीही संबंधित कंपनीला तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहोचवण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

मात्र लार्सेन ॲण्‍ड टुब्रो कंपनीसह राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व त्यांची यंत्रणा देखील प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर सुमारे दीड तासांनी घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे उपस्थित नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असताना या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दाखवण्यात आलेली ही दिरंगाई नागरिकांनी आपल्या शेलक्या भाषेत बोलून दाखविली.

यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग विभागाला वाहतूक पोलिसांनी तसेच लार्सेन ॲण्‍ड टुब्रो कंपनीस राष्ट्रीय  महामार्गावरील दरडीचे काम सुरू असताना पावसाळी काळात या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले होते. असे असूनही या कंपनीमार्फत तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून झालेल्या विलंबाबाबत महाडचे प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी या दोन्ही यंत्रणांकडे स्पष्टीकरण मागितले असून यापुढील काळात किमान अर्ध्या तासाच्या आत संबंधित घटनास्थळीही आपत्ती यंत्रणेने दाखल व्हावे, असे स्पष्ट निर्देश दिले. या संदर्भात दिरंगाई झाल्यास सन २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत .

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य घटना लक्षात घेऊन संबंधित विभागाने आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवली जाईल, अशी माहिती आपत्ती नियंत्रण विभागाकडून घेण्यात आलेल्या पावसाळा पूर्वीच्या बैठकीत दिली होती. मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसल्याने या आपत्ती यंत्रणेमध्ये अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.

सकाळी साडेपाच वाजता या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. ती साडेतीन तासांच्या तीन जेसीबी व एक रोलरच्या साह्याने केलेल्या कामानंतर पूर्ण झाल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्ण सुरू करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेऊन या ठिकाणी त्यासंदर्भात बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे .

या दरम्यान महामार्गावरील वाहतुकीमध्ये तीन रुग्णवाहिकांतून असलेल्या रुग्णाला महामार्गावरील दरड दूर करण्याचे प्राथमिक प्रयत्न झाल्यानंतर प्राधान्याने मार्ग करून देण्याची व्यवस्था महामार्ग पोलिसांकडून करण्यात आल्याबद्दल संबंधित रुग्णांकडून प्रशासनाला धन्यवाद देण्यात आले.

पहाटे साडेपाच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षात गेल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये महाड कक्षातून संबंधित राष्ट्रीय महामार्ग व कंपनीकडे याबाबत पुढील यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर सकाळी सातच्या सुमारास  म्हणजे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन सावंत हे घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गाची उपकार्यकारी अभियंता गायकवाड हे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विभागाकडून करण्यात येणाऱ्या आपत्ती यंत्रणेची  उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. सकाळी साडेआठ वाजता प्रथम तीन रुग्णवाहिकांना सोडण्यात आले. त्यानंतर नऊच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे .