Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Konkan › ‘नाणार’वरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा  विकास आराखडा जाहीर : राष्ट्रवादी

‘नाणार’वरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा  विकास आराखडा जाहीर : राष्ट्रवादी

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 11:04PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विविध राजकीय पक्षांनी नाणार रिफायनरीला विरोध केल्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा विकास आराखडा जाहीर केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

मुंबईत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकास आराखड्याची माहिती ट्विटरवर देण्याऐवजी ती स्वतः जाहीर करायला पाहिजे होती. आर्थिक राजधानी असलेल्या या शहराच्या आराखड्याची माहिती प्रधान सचिव आणि आयुक्त जाहीर करतात, हे आपण कधी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पाहिले नव्हते, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.
तटकरे म्हणाले, कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांमध्येच वाद सुरू आहे.  राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्यापाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योगमंत्र्यांना नसल्याचे सांगितले. 

इतकेच नाही, तर त्यांचे ते व्यक्तिगत मत होते असे स्पष्ट केले. आपणही सत्तेत होतो. पण सरकारी धोरणात्मक निर्णयावर एखाद्या मंत्र्याचे व्यक्तिगत मत असू शकते हे मला मुख्यमंत्र्यांकडून समजले, अशा  शब्दांत आश्‍चर्य व्यक्त करत तटकरे यांनी नाणार प्रकल्पाची प्रक्रिया आणि त्याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचेही तटकरे यांनी सांगितले.    

सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते. सरकारी आकडेवारीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ हा कायमच आहे. मात्र, या सरकारची दुष्काळाची व्याख्या काय आहे, याचे आकलन होत नसल्याचेही तटकरे म्हणाले.