Sat, Jul 20, 2019 15:33होमपेज › Konkan › ‘नाणार’समर्थनार्थ पत्रकार परिषद उधळली

‘नाणार’समर्थनार्थ पत्रकार परिषद उधळली

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:21PMमुंबई : प्रतिनिधी

कोकणात येऊ घातलेल्या  नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बचाव समितीच्या वतीने अजयसिंह सेंगर यांची मुंबई मराठी पत्रकार संघात सुरू असलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, किशोर बने आणि रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. यामुळे  पत्रकार संघात एकच गोंधळ उडाला होता. 

या पत्रकार परिषदेला विरोध होणार हे लक्षात घेऊन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, तरीही गनिमी काव्याने येऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि प्रकल्पग्रस्त पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून न घेता तुम्ही या प्रकल्पाचे समर्थन कशासाठी करत आहात, असा प्रश्‍न करत कार्यकर्त्यांनी सेंगर यांची पत्रकार परिषदच उधळून लावली. पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेंगर यांच्यासमोरील टेबल आणि खुर्च्या वाजवून ‘नारायण राणे झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तर किशोर बने आणि रिफायनरीविरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनीही अजयसिंह सेंगरविरोधात घोषणा देऊन कोकणात येण्याचे आव्हान दिले. यामुळे वातावरण चिघळल्याचे पाहून आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले.

  तुम्ही कोकणात रहाणारे नसूनही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून न घेता कोणत्या उद्देशाने नाणार प्रकल्प बचाव समिती स्थापन केली. तसेच तुमचे वास्तव्य पनवेल याठिकाणी असताना तुमचा नाणार प्रकल्पाशी काय संबंध? अशा प्रश्‍नांचा पत्रकारांनी सेंगर यांच्यावर  भडिमार केला असता सेंगर यांनी कोकणात रोजगार नसल्याने आज येथील युवक वडापाव विकणे, रिक्शा चालवणे आदी व्यवसाय करत आहेत. या प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी कोकणातील युवकांना प्रथम रोजगार मिळवून द्यावेत. कोकणातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी आम्ही या प्रकल्पाचे समर्थन करत आहोत. तसेच प्रकल्पामुळे येथील गावांतील 1 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आणला आहे. त्यावर राजकारण करुन तो गुजरात नेण्याचा प्रयत्न सुरु आहे, तो आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.