Sat, Apr 20, 2019 18:31होमपेज › Konkan › ‘नाणार’ प्रकल्प लादणार नाही

‘नाणार’ प्रकल्प लादणार नाही

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:04PMमुंबई : प्रतिनिधी 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला कोकणातील नागरिकांचा वाढता विरोध असल्याने हा प्रकल्प तेथील जनतेवर लादणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीला दिली. मात्र, जनतेचा विरोध लक्षात घेऊन या प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समितीतर्फे बुधवारी आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन करण्यात आले व हा प्रकल्प सरकारने त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

समितीच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष अशोक वालम, नितीन जठार, सत्यजित चव्हाण,रामचंद्र भडेकर, अश्‍विनी वालम, सत्यवान पाळेकर, मजीद भाटकर, संजय राणे, सीमा वालम, सोनाली ठुकरूल, नेहा दुसणकर यांचा समावेश होता.

कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे, त्यामुळे जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही व औद्योगिक क्षेत्राबाबतचा अध्यादेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रकल्पाविरोधातील आंदोलन सुरू राहील, असा निर्धार कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीने केला आहे. समितीतर्फे आझाद मैदानात प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ते मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा मान ठेवून आम्ही उपोषण स्थगित करत आहोत. मात्र, प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार अशोक वालम यांनी व्यक्त केला.  प्रकल्प राबवण्यासाठी सक्ती केली जाणार नाही; मात्र प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती वालम यांनी दिली. प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी ग्रामसभांचा ठराव करून या प्रकल्पाला विरोध दर्शवला 

आहे. प्रकल्प रद्द झालाच पाहिजे : नारायण राणे 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असून हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. या प्रकल्पाबाबत शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असून विरोध करणारे व मंजुरी देणारे शिवसेनेचे नेते असल्याचे ते म्हणाले. आपण प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष समितीसोबत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. भाजपतर्फे राज्यसभेवर जात असलो तरी या प्रकल्पाला विरोध असून गरज पडल्यास खासदारकी पणाला लावण्याचा इशारा त्यांनी दिला.