Thu, Jul 18, 2019 16:47होमपेज › Konkan › कोकण रेल्वेतील नियोजनाचा अभाव चव्हाट्यावर

कोकण रेल्वेतील नियोजनाचा अभाव चव्हाट्यावर

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 9:53PMमुंबई : राजेश सावंत

कोकण रेल्वे व पश्‍चिम रेल्वेच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांना वैभववाडी रोड स्टेशनवर थांबा देण्यात आलेला नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना जोडणार्‍या या गर्दीच्या स्टेशनवर थांबा न देऊन कोकण रेल्वेने आपल्या नियोजनात अभाव असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे हजारो चाकरमान्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल  झाल्यामुळे गावी कसे जायचे असा प्रश्‍न चाकरमान्यांना पडला होता. पण पश्‍चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई सेंट्रल, बांद्रा व अहमदाबाद येथून व्हाया वसई कोकणात विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. पण या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यापुर्वी कोकण रेल्वेला योग्य नियोजन करता आले नाही. त्यामुळे अनेक म्हत्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाड्या थांबणार नाहीत. विशेषत: सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वैभववाडी रोड या गर्दीच्या स्टेशनवर थांबा न देऊन, कोकण रेल्वेने आपल्या नियोजनात अभाव असल्याचे दाखवून दिले. वैभववाडी स्टेशन केवळ वैभववाडी तालुक्यातील 37 गावांना जवळचे स्टेशन नाही तर, गगनबावडा, देवगड, कणकवली, राजापूर या तालक्यातील सुमारे 40 हून जास्त गावांना जवळचे स्टेशन आहे. या स्टेशनवर कोकणकन्यासह तुतारी एक्सप्रेससह दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी थांबते. पण या गाड्या येथील प्रवाशांसाठी अपुर्‍या आहेत. या स्टेशनवरून प्रवास करणार्‍यांची सर्वाधिक संख्या असताना, दरवर्षी विशेष गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. 

     यंदा गणपतीला प्रवाशांच्या सवेसाठी पश्‍चिम व कोकण रेल्वेने सहा विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्यांना सावंतवाडी स्टेशनपासून अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या मडूरे या छोट्या स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. पण जेथे नेहमीच शेकडो प्रवाशांची  गर्दी असते, अशा वैभववाडी स्टेशनला डावलण्यात आले आहे. या विशेष गाड्या रत्नागिरी येथून सुटल्यानंतर सुमारे 110 किमीवर असलेल्या कणकवलीला थांबणार आहेत. या दोन स्टेशनमध्ये विलवडे, राजापूर व वैभववाडी ही महत्त्वाची स्टेशनही आहेत. पण कोकण रेल्वेने या भागातील प्रवाशांचा विचारच केलेला नाही. वास्तविक रत्नागिरीनंतर विलवडे, राजापूर व वैभववाडी या तीन स्टेशनवर थांबा देणे अपेक्षित होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या स्टेशनवर अवलंबून असणार्‍या सुमारे 200 ते 250 गावातील हजारो चाकरमान्यांना रत्नागिरी व कणकवलीला उतरावे लागणार आहे.

गणेशोत्सव आमचा नाही का ?

कोकण रेल्वेने नेहमीच वैभववाडी स्टेशनला दुय्यम स्थान दिले आहे. वैभववाडी येथे सर्वाधिक प्रवासी ये-जा करत असताना, विशेष गाड्यातून या स्टेशनला डावलण्याचे कारण समजले नाही. या भागातील लोकांचा गणेशोत्सव नाही का ? 

प्रितेश रावराणे, नोकरी, विरार

..तर एकही गाडी वैभववाडीतून जाऊ देणार नाही

कोकण रेल्वेकडून दरवर्षी वैभववाडी स्टेशनला डावलण्यात येत आहे. या भागातील प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाने कधीच विचार केला नाही. त्यामुळे यापुढे विशेष गाड्यांना वैभववाडीत थांबा दिला नाही तर, एकही गाडी वैभववाडीतून पुढे जाऊ देणार नाही. 

रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष, वैभववाडी 

    
   रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार : आ. राणे

वैभववाडी रेल्वे स्टेशन हे कोकणातील प्रमुख स्टेशन आहे. त्यामुळे तेथे गणपती विशेष गाड्या थांबल्याच पाहिजे. यासाठी आपण स्वत: व  माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे रेल्वेमंत्र्यांकडे वैभववाडी स्टेशनवर विशेष गाड्यांनाच नाही, तर अन्य गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी लवकरच चर्चा करणार, असे आ. नितेश राणे म्हणाले.