Thu, Jul 16, 2020 08:22होमपेज › Konkan › समृद्धी भूतकरने सर केले १५ हजार फुट उंचीचे पिकी शिखर 

समृद्धी भूतकरने सर केले १५ हजार फुट उंचीचे पिकी शिखर 

Published On: May 07 2018 6:45PM | Last Updated: May 07 2018 6:45PMपोलादपूर : धनराज गोपाळ

गिर्यारोहक समृद्धी प्रशांत भूतकर हिने नेपाळ येथील १५ हजार फुट उंचीवरील पिकी शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. पोलादपूर येथील रहिवासी असलेली आणि पुण्याच्या आबासाहेब गरवारे कॉलेजची ती विद्यार्थीनी आहे. यापूर्वी समृद्धीने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी १७ हजार पाचशे फुट उंचीवरील फ्रेंड्स शिप शिखर सर करून विश्वविक्रम करत सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला होता.

तसेच तिने एवरेस्‍ट बेसकॅम्पसह हिमालयातील इतर सहा शिखरे व चार हिमालयीन मोहिमांचे यशस्वीपणे नेतृत्व तसेच सह्याद्रीतील ऐतिहासिक अभ्यासाच्या शोधमोहिमा व अनेक गड किल्ल्यावर भटकंती केली आहे. याबरोबरच रायगड व प्रतापगड प्रदक्षिणा असा तिचा गेल्या सहा वर्षात गिर्यारोहण क्षेत्रातील चढता आलेख आहे. समृद्धीच्या गिर्यारोहण क्षेत्रातील कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांनी, संघटना, व शासकीय स्तरावर तिला सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील गिर्यारोहण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुप्रसिद्ध गिरिप्रेमी संस्थेबरोबर सहभागी होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पोलादपूर ते काठमांडू असा प्रवास केला. तर आपल्या सहका-यांबरोबरच काठमांडू ते जिप्रो असा अतिशय खडतर प्रवास केला. हा खडतर प्रवास करताना तिला ढगाळ वातावरण व हिमवर्षावाला सामोरे जावे लागले. तीन दिवसाच्या या खडतर प्रवासानंतर तिने पिकी शिखरावर पाय ठेऊन भारताचा तिरंगा फडकविला. या मोहीमेत हेतल अगसकर,समृद्धी भूतकर,प्रशांत भूतकर, भोलाराम शेर्पा,चिरी शेर्पा यांचा देखील सहभाग होता.

समृद्धी भूतकर ही कर्तव्य प्रतिष्ठान,यंग ब्लडस् ऍडव्हेंचर्स,पोलादपूर या संस्थेची सभासद असुन,गिरिप्रेमी पुणे,सिस्केप महाड या संस्थेच्या मोहीमेत तीने सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे समृद्धीचे वडील देखील तिच्या मोहीमांमध्ये सहभागी होतात. ते पेशाने वकील आसुन ते उत्तम गिर्यारोहक असुन इतिहास लेखन करत असून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

या मोहिमेबाबत समृद्धीशी बातचीत केली असता, या सर्व मोहीम पूर्ण करण्यात आई आणि वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले..