Tue, Jul 07, 2020 08:42होमपेज › Konkan › मुलाच्या पगारासाठी मातेचा दुर्गावतार!

मुलाच्या पगारासाठी मातेचा दुर्गावतार!

Published On: Jul 09 2019 1:16AM | Last Updated: Jul 08 2019 10:58PM
वैभववाडी ः प्रतिनिधी

वैभववाडी नगरपंचायतीमध्ये अनुकंपा तत्त्वावर गेले चार महिने शिपाई पदावर कार्यरत असलेल्या आपल्या मुलाचा चार महिने पगारच काढण्यात आला नाही. उलट हजेरी पत्रकावर त्याच्या नावावर कागद चिकटवून अन्य व्यक्‍तीचे नाव लिहिण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अनिता मनोहर करकोटे यांनी सोमवारी सकाळी रॉकेलचे कॅन घेऊन न. पं. कार्यालयात धाव घेतली. त्यांनी कर्मचार्‍यांना आत कोंडून बाहेरून कुलूप ठोकले. माझ्या मुलाचा आतापर्यंतचा सर्व पगार काढत नाही तर मी स्वतःला पेटवून घेईन, असा इशारा दिला. अखेर मुख्याधिकार्‍यांशी बोलून कर्मचार्‍यांनी त्याचे नाव परत हजेरी पुस्तकात घेऊन सही घेतली. त्यानंतर त्या शांत झाल्या. मात्र, पगार निघाला नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वैभववाडी ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून मनोहर करकोटे हे कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा सचिन करकोटे याला अनुकंपाखाली घेण्यात यावे यासाठी श्रीमती अनिता करकोटे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर त्याला 8 मार्च 2019 पासून सचिन याला न. पं. मध्ये शिपाई म्हणून घेण्यात आलेे. मात्र, गेले चार महिने त्याला   पगारच मिळालेला नाही. याबाबत श्रीमती करकोटे यांनी न. पं. कडे  पाठपुरावा केला, तरीही पगार काढण्यात आला नाही. त्यातच शनिवारी न.पं.हजेरी पुस्तकातील सचिन करकोटेच्या नावावर पट्टी लावून त्यावर दुसरे नाव लिहिल्याची माहिती त्यांना समजली. ही बाब सचिन याने  आपल्या आईला सांगितल्यावर त्या संतप्त झाल्या. सोमवारी सक़ाळी त्या हातात रॉकेलचा कॅन घेऊन थेट न. पं. कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी याबाबत कर्मचार्‍यांना जाब विचारला. एकतर चार महिने मुलाचा पगार नाही, आम्ही जगायचे कसे?खायचे काय? त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . आता तर तुम्ही हजेरी पुस्तिकेतील नाव का काढले? अशा प्रश्‍नांची त्यांनी कर्मचार्‍यांवर सरबत्ती केली. मुख्याधिकारी हजर नसल्यामुळे त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्याची हजेरी पत्रकात सही घेण्यास सांगितली. त्यामुळे त्या थोड्या शांत झाल्या. मात्र, माझ्या मुलाचा पगार होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.