Sun, Jul 12, 2020 20:58होमपेज › Konkan › पर्यटन व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पर्यटन व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: Jun 19 2019 1:35AM | Last Updated: Jun 18 2019 11:28PM
ओरोस : प्रतिनिधी
कोकणातील पर्यटन व्यवसायावर नेहमीच अन्याय झाला आहे. स्वतंत्र पर्यटन महामंडळ असूनही पर्यटन विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतुद नाही. आजही शासन 70 वर्षांपूर्वीचे  पर्यटण धोरण राबवत आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासाचे कोणतेही नियोजन शासनाकडे नाही. सीआरझेड कायद्याचा किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांवर विपरीत परिणाम होत आहे, असे विविध आरोप करत जिलह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या समस्या व मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना सादर केले. शासनाने या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी दिला. या नंतर पर्यटकांनी सिंधुदुर्गनगरी ते मालवण अशी विकास यात्रा काढली.  

सिंधुदुर्गासह कोकणातील पर्यट विकास आणि व्यवसायावर होणारा अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.  जि. प.चे माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, बाबा परब, मंदार केणी, संतोष कदम, भाई केळुसकर, अविनाश सामंत, देवानंद लोकेगावकर, राकेश तळगांवकर आदींसह जिल्हाभरातील पर्यटन व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले होते. 

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला योग्य दिशा दिली जात नाही. कुठल्याही पर्यटन स्थळाचे  सुयोग्य नियोजन नाही. किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांनी केलेली बांधकामे शासनाने सी. आर. झेड अंतर्गत अनधिकृत ठरवून ती तोडण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. ही कारवाई रोखण्यासाठी व अन्य पर्यटन विषयक प्रश्‍नांबाबत शासनाकडे दाद मागून ही कार्यवाही होत नसल्याने आज आमच्यावर  जनआंदोलनाची वेळ आल्याचे या पर्यटकांनी सांगितले.

पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्‍नांसाठी आपण समृध्द कोकण संघटनेतर्फे लढा पुकारल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले. या आंदोलनाची सुरूवात आणि कोकणातील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला जाग आणून देणे गरजेचे आहे. अनेकवेळा शासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाल्याने आता सरकार व्यावसायिकांच्या आत्महत्येची वाट बघतेय काय? असा सवाल  पर्यटन व्यावसायिकांनी केला.  स्वतंत्र कोकण पर्यटन प्राधिकरण निर्माण करणे व पर्यटन व्यावसायासाठी भरघोस आर्थिक सहाय द्यावे, भूमीपुत्र पर्यटन व्यावसायिकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या मिळणे आदी मागण्यांबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. या नंतर पर्यटन व्यावसायिकांनी सिंधुदुर्गनगरी ते  मालवण, तारकर्ली, देवबाग अशी विकास यात्रा काढली.