Wed, Apr 24, 2019 12:09होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’ची महावितरण कार्यालयावर धडक

‘स्वाभिमान’ची महावितरण कार्यालयावर धडक

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:36PMमालवण : वार्ताहर

सतत खंडित होणार्‍या तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग या भागातील ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मालवण महावितरणच्या अभियंत्यांना जाब विचारात धारेवर धरले. या भागात अतिरिक्‍त ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने वीज वितरणच्या या भोंगळ कारभारावर यावेळी आसूड ओढण्यात आला. ही समस्या सोडविण्यासाठी वायरी भूतनाथ तसेच तारकर्ली येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,तालुकाध्यक्ष मंदार केणी,तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर,डॉ. जितेंद्र केरकर,जयवंत सावंत आदींसह  ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

वायरी भूतनाथ,तारकर्ली,देवबाग गावातील वीज समस्यांबाबत महावितरणचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच अलिकडे वारंवार दीर्घकाळ खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन हंगामात मोठा त्रास सहन करावा लागला. पर्यटकांचेही मोठे हाल झाले.तसेच कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होण्याच्या घटनाही घडत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी वायरी भूतनाथ शिवाजी पुतळ्याकडे तसेच तारकर्ली केळुसकरवाडी येथे नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी करण्यात येत असून याबाबत वेळोवेळी वीज कंपनीशी पत्रव्यवहार करून तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. फक्‍त तोंडी आश्‍वासने देण्याचे काम अधिकारी करत आहेत. मात्र, कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही, असे यावेळी ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांनी सांगत वीज अभियंता योगेश खेर यांना धारेवर धरले. 

अशोक सावंत यांनी वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही जाब विचारात प्रश्‍नांची सरबत्ती केली. ट्रान्सफॉर्मरची कोणतीही देखभाल दुरुस्ती होत नाही, तसेच वीज कर्मचारीही उपलब्ध होत नाही, अशी नाराजी सरपंच स्नेहा केरकर व ग्रामस्थांनी व्यक्‍त करत तारकर्ली येथे अतिरिक्‍त ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी लावून धरली. तारकर्ली-देवबाग-वायरी गावसह मालवण तालुक्यातील वीज समस्या पावसाळ्यापूर्वी सोडविल्या गेल्या नाहीत तर याबाबत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात येईल, असा इशारा यावेळी मंदार केणी यांनी दिला. यावेळी वीज अभियंता योगेश खेर यांनी वीज समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.